महाराष्ट्रातील आणि देशाच्या काही भागातील वनांचे वैशिष्टय़ असलेल्या देवराईंची आजची स्थिती बिकट 11Devrai1आहे.. पण त्याबाबत केवळ चिंता व्यक्त करून गप्प न बसता त्यांच्या संवर्धनासाठी पुण्यात एका गटाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी देवराईंचे अभ्यासक आणि काही कार्यकर्ते एकत्र आले असून, विविध उपक्रमांद्वारे ही मोहीम पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पिढय़ान् पिढय़ा श्रद्धेने जपलेल्या देवराईंची आजची स्थिती चांगली नाही. त्यांच्यावर अनेक आघात होत आहेत. काही अभ्यासक किंवा लहानसे गट त्यांचा अभ्यास व टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यासाठी मोठय़ा दबावगटाची आवश्यकता आहे. अन्यथा, हा जिवंत आणि आजही उपयुक्त ठरणारा वारसा नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळेच देवराई जपण्यासाठी पुण्यातील काही वनस्पतिअभ्यासकांनी पुढाकार घेतला आहे. त्यात डॉ. श्री. द. महाजन, माधव गोगटे, डॉ. हेमा साने, डॉ. विनया घाटे, डॉ. दिगंबर मोकाट यांचा समावेश आहे.
देवराईंच्या संवर्धनासाठी तरुण पिढीतील कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये त्याबाबत माहिती व जागृती वाढवण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येत आहे. अनेक देवराईंमध्ये अलीकडच्या काळात अस्वच्छता वाढली आहे. अनेक पर्यटक किंवा भाविक तेथे जातात, मात्र तेथे स्वच्छता पाळत नाहीत. त्यामुळे सुनील भिडे आणि डॉ. अजित वर्तक यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन देवराई स्वच्छता अभियानाला सुरूवात केली आहे. याचबरोबर देवराईबाबत लवकरच ब्लॉग सुरू करण्यात येत आहे. त्यावर तज्ज्ञ, कार्यकर्ते आणि नागरिक आपले विचार मांडू शकतील, विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील, अशी माहिती या मोहिमेतील कार्यकर्ते सुनील भिडे आणि डॉ. अजित वर्तक यांनी दिली.

‘संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी व्हा’
‘‘ख्यातनाम वनस्पतितज्ज्ञ दिवंगत डॉ. वा. द. वर्तक यांनी ‘महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी’ या संस्थेची स्थापना केली होती. तिला आता २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त डॉ. वर्तक यांना श्रद्धांजली म्हणून देवराईच्या संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम कोण्या एका संस्थेची नाही. त्यामुळे या मोहिमेत सर्वच संस्थांचे प्रतिनिधी आणि अभ्यासकांनी सहभागी व्हावे. त्यासाठी ९४२०४८१७५१ / ९८६०७०१९६० या क्रमांकांवर किंवा missiondevrai@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.
– सुनील भिडे / डॉ. अजित वर्तक (कार्यकर्ते, मिशन वनराई)