जिल्हाधिकारी सौरभ राव यांची माहिती

उपचारांअभावी जिल्ह्य़ातील एकाही बालकाचा जीव धोक्यात येऊ नये, या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने ‘मिशन धन्वंतरी’ ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेनुसार शून्य ते १४ वर्षे वयोगटातील सुमारे दोनशे बालकांवर जिल्हा प्रशासनाकडून मोफत उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंगळवारी दिली.

हृदयविकार असलेल्या वैशाली यादव या सहा वर्षांच्या चिमुकलीने उपचारासाठी पसे नसल्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मदत मागितली होती. त्या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाने वैशाली हिच्यावर खासगी रुग्णालयात शस्रक्रिया करण्याची व्यवस्था केली. या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आíथकदृष्टय़ा गरीब बालकांवर उपचार करण्यासाठी ‘मिशन धन्वंतरी’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या जिल्हा स्तरावरील बैठकीमध्ये या योजनेवर सविस्तर चर्चा करून या योजनेचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.

सौरभ राव म्हणाले,की उपचारासाठी पसे नाहीत या कारणास्तव जिल्ह्य़ात एकाही बालकाचा जीव जाऊ नये, या उद्देशातून मिशन धन्वंतरी ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, अंगणवाडी, आश्रमशाळा येथे जाऊन सर्वेक्षण केले आहे. शून्य ते १४ वर्षे वयोगटातील २००  मुलांवर उपचार करणे आवश्यक असल्याचे या सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. यामध्ये प्राधान्याने ४३ मुलांना शस्त्रक्रियांची गरज आहे. या सर्व मुलांवर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य विमा योजना लागू होऊ शकणाऱ्या मुलांवर या मिशन धन्वंतरी योजनेअंतर्गत उपचार केले जाणार आहेत. तर, जीवनदायी योजनेच्या निकषामध्ये बसू न शकणाऱ्या मुलांवर ट्रस्ट संचालित रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. तसेच, या रुग्णालयाच्या नफ्यातील काही हिस्सा हा आयपीएफ फंडामध्ये जमा केला जातो. त्याअंतर्गत या मुलांवर उपचार करण्यात येणार आहे. या दोन्ही वर्गवारीच्या निकषामध्ये बसू शकत नाहीत अशा मुलांवर ‘उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व’ मधून(सीएसआर) उपचार करण्यात येणार आहेत.