पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बी.कॉम परीक्षेच्या ‘फायनान्शिअल अकाऊंटिंग’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गुणांच्या प्रश्नांमध्ये चुका असल्याचा दावा शिक्षकांनी केला आहे. अनुभव नसलेल्या व्यक्तींकडून प्रश्नपत्रिका काढल्यामुळे प्रश्नपत्रिकेत चुका राहिल्याचा आरोप बहिष्कारी प्राध्यापकांनी केला आहे.
पुणे विद्यापीठाची प्रथम वर्ष बी.कॉमची परीक्षा सुरू आहे. शनिवारी ‘फायनान्शिअल अकाऊंटिंग’ या विषयाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या प्रश्न क्रमांक तीनमधील ए प्रश्न वाचून नेमके काय अपेक्षित आहे, हे स्पष्ट होत नाही. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक चार ए हा चुकलेला आहे. अशी माहिती स. प. महाविद्यालयाचे वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. उल्हास किवळकर यांनी दिली आहे. हे दोन्ही प्रश्न स्पष्ट होत नाहीत, त्यामुळे ते कशाप्रकारे सोडवावेत याबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला असल्याचे शिक्षकांनी सांगितले. याबाबत विद्यार्थी विद्यापीठाकडे अर्ज करणार असल्याची माहितीही शिक्षकांनी दिली.
अनुभव नसलेल्या शिक्षकांकडून प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्यामुळे अशा प्रकारच्या चुका झाल्याचा आरोप प्राध्यापक संघटनेच्या सदस्यांनी केला आहे.