एकदा शाळांच्या बाजूने पत्र द्यायचे, पालकांनी आवाज उठवला की नवे पत्र काढायचे, मग एखाद्या शासन निर्णयाचा आधार घेत आणखीच वेगळे परिपत्रक काढायचे .. असा गोंधळ उडवून  देण्यात माहीर असलेल्या शिक्षण विभागाने आता शाळेने केलेल्या शुल्कवाढीच्या प्रकरणी शुल्क नियमन समितीच्या निर्णयापर्यंत वाढीव शुल्क न घेण्याचे आदेश एमआयटी शाळेच्या प्रकरणी दिले आहेत.
गेल्यावर्षांपासून शहरातील शाळांबरोबर शुल्कवाढीच्या विरोधात पालकांचा संघर्ष सुरू आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या विविध पत्रांमुळे गोंधळात अधिकच भर पडली. शाळेकडून बाजू मांडली गेली की शाळेच्या बाजूने पत्र द्यायचे किंवा संदिग्ध परिपत्रक काढायचे. त्याबाबत पालकांनी आंदोलन केले की पालकांच्या बाजूने पत्र द्यायचे अशा उलट-सुलट पत्रप्रपंचात आणखी थोडीशी भर शिक्षण विभागाने घातली आहे. शुल्क नियंत्रण समितीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत जुनेच शुल्क घेण्यात यावे असा निर्णय एमआयटी शाळेच्याबाबतीत उपसंचालक कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे इतरही शाळांशी संबंधित पालक संघटना आता सरसावल्या आहेत.
एमआयटी शाळेने केलेल्या भरमसाट शुल्कवाढीच्या विरोधात पालकांनी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत वाढीव शुल्क आकारण्यात येऊ नये असा निर्णय मार्चमध्ये देण्यात आला होता. मात्र तरीही शाळेने वाढीव शुल्क पालकांकडे मागितले. त्यालाही शिक्षण विभागाच्या पत्राचाच आधार दिला. पालकांनी वाढीव शुल्क भरण्यास नकार दिला. पुन्हा एकदा पालक विरूद्ध शाळा हा वाद शिक्षण विभागाकडे आला. याबाबत सोमवारी (११ जानेवारी) पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. कार्यालयाच्या आवारात पुन्हा एकदा आंदोलनाचे स्वरूप आले. मात्र शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव कार्यालयात हजर नव्हते. अखेर त्यांनी फोनवर दिलेल्या सूचनांनुसार शिक्षण विभागाने आता नवे पत्र दिले आहे. ‘एमआयटी शाळेने प्राथमिक वर्गासाठी १६ हजार आणि माध्यमिक वर्गासाठी २० हजार रुपये शुल्क आकारावे. ज्या पालकांनी वाढीव शुल्क भरले आहे, त्यांचे शुल्क पुढील वर्षांच्या शुल्कातून वजा करण्यात यावे. शुल्क नियमन समितीचा पुढील आदेश येईपर्यंत शुल्कवाढ करू नये,’ अशा आशयाचे पत्र पालकांना देण्यात आले आहे.
एका शाळेच्या पालकांना हे पत्र मिळाल्यामुळे आता इतरही शाळांमध्ये आंदोलन करणाऱ्या पालक संघटना सरसावल्या आहेत. मात्र अद्याप विभागीय शुल्क नियमन समित्या स्थापन न झाल्यामुळे पालक आणि शाळा प्रशासनातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.