05 March 2021

News Flash

‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर!’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा

'हेच का तुमचे अच्छे दिन' असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी केला

मनसेचा पुण्यात मोर्चा

पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मगितल्याप्रकरणी मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे बदली झाली असल्याचा आरोप करीत आज पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेचा कोंढवा पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढण्यात आला.या मूक मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या मूक मोर्चाचे नेतृत्व मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केले. ते यावेळी म्हणाले, भाजपचे आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या भावावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्याऐवजी कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या मिलिंद गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. हा भारतीय जनता पक्षाचा कुठला पारदर्शी कारभार आहे. आमदार योगेश टिळेकर यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो पूर्ण चौकशीअंती झाला आहे. त्याचे सर्व पुरावे पोलिसांकडे आहेत. असे असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. ही निषेधार्थ बाब असून शासनाचा सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, मिलिंद गायकवाड यांना न्याय मिळाला नाही. तर भविष्यात जे काही होईल त्याला सर्वस्वी पोलीस यंत्रणा जबाबदार राहतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी त्यांनी दिला.

^ या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते

^ ‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर’, ‘हेच का तुमचे अच्छे दिन’ असे फलक मोर्चात दिसले

^ महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती

^ कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची बदली करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध असे फलक घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले

काय आहे हे प्रकरण

भाजपचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी अचानक बदली करण्यात आली. ही बदली राजकीय दबावामुळे झाली असावी अशी चर्चा पोलीस दलात आणि पुणे शहरात सुरू झाली आहे. या बदली विषयी मिलिंद गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले, माझी कोणत्याही राजकीय कारणास्तव बदली झाली नसून मी बदलीचा अर्ज दिला होता. त्यानुसार बदली झाली आहे.

योगेश टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी मागितली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यामध्ये टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे, रविंद्र बराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी रवींद्र बराटे यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिकारी गायकवाड कोंढवा पोलीस स्थानकात आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेत असताना त्यांच्या सहकाऱ्यांना आणि त्यांनाही अश्रू अनावर झाले. याचा व्हिडियो कॅमेरात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिलिंद गायकवाड कोंढवा पोलीस स्टेशन येथे १४ महिन्यांपूर्वी रुजू झाले होते. याठिकाणी सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होत नाही तोवर दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांची बदली करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला. त्यानंतर आज त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमधील कर्मचारी वर्गाला आपण पदभार सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांना डोळ्यातील अश्रू पाहून गायकवाड यांनाही अश्रू अनावर झाले.

या प्रकरणावरून आता पुण्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत असून राज्यातील सत्ताधारी भाजपा यासंदर्भात काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 12:57 pm

Web Title: mns protest against police inspector milind gaikwads transfer
Next Stories
1 PHOTO: साताऱ्यातील तरुणाईमध्ये नवीन राजांचा ‘उदय’
2 मोदी भेटीचा हट्ट धरणा-या तृप्ती देसाईना पुण्यात अटक
3 पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची जोरदार हजेरी
Just Now!
X