पुणे : गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी मंडई, बेलबाग चौक तसेच शहराच्या मध्य भागात गर्दी सुरू झाली आहे. मध्यभागात मोबाइल चोरटय़ांची टोळी सक्रिय आहे. तुळशीबागेत एकाचा मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरटय़ाला पोलिसांनी पकडले.

रामू रत्नाप्पा चव्हाण (वय २३, रा. माचारपूर तांडा, जि. धारवाड, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. इम्तियाज शेख (सध्या रा. बुधवार पेठ) यांनी या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख बेलबाग चौकातून तुळशीबागेच्या दिशेने निघाले होते. त्या वेळी गर्दी होती. गर्दीच्या रेटय़ात चव्हाण याने शेख यांच्या पँटच्या खिशात ठेवलेला मोबाइल संच नकळत काढून घेतला. चव्हाण यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी आरडाओरडा केला. गर्दीतून पसार झालेल्या चव्हाणला पोलिसांनी पकडले. चव्हाणने बेलबाग ते मंडई परिसरात मोबाइल संच लांबवण्याचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी. एम. रायकर तपास करत आहेत.

गणेशोत्सवात बेलबाग चौक ते मंडई भागात मोठी गर्दी असते. या कालावधीत परगाव तसेच परराज्यातून मोठय़ा संख्येने भाविक येतात. गर्दीत चोऱ्या करण्यासाठी खास परगावातील चोरटय़ांची टोळी मंडई भागात येते. मंडई ते बेलबाग चौक भागात चोरटे गर्दीत फिरतात. महिलांच्या पिशवीची चेन उघडून ऐवज लांबविणे तसेच मोबाइल हिसकावण्याचे गुन्हे उत्सवाच्या कालावधीत घडतात. गेल्या वर्षी पोलिसांनी या भागात मोबाइल हिसकावणारी चोरटय़ांची टोळी पकडली होती.

दरम्यान, कर्वेनगर भागात दुचाकीस्वाराचा मोबाइल हिसकावण्याची घटना घडली. या बाबत आनंद पाणीभाते (वय ४२, रा. धायरी) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार आनंद रात्री अकराच्या कर्वेनगर भागातील टोळ सभागृहासमोरून निघाले होते. त्या वेळी त्यांच्या मागावर असलेल्या दुचाकीस्वार चोरटय़ांनी आनंद यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेला २३ हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेला. सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा तपास करत आहेत.

परराज्यातील टोळी सक्रिय

शहराच्या मध्य भागात पाकीटमारी, दागिने हिसकावणे, मोबाइल संच लांबविणे अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी साध्या वेशातील पोलिसांचे पथक मंडई ते बेलबाग चौकात गस्त घालते. मोबाइल संच, दागिने लांबविण्याच्या गुन्हय़ात परराज्यातील टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंब्रा भागातील चोरटे उत्सवाच्या कालावधीत चोऱ्या करतात.