नैर्ऋत्य मान्सून रविवारी (१८ मे) अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दाखल होण्यास अनुकूल स्थिती असून, त्या भागात पुढील तीन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून शनिवापर्यंत अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात दाखल होईल, असा अंदाज चार दिवसांपूर्वी हवामान विभागाने जाहीर केला होता. मात्र, शनिवापर्यंत तो दाखल झाला नाही. मान्सून या भागात रविवापर्यंत पोहोचण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. या भागात सध्या वादळी पावसाच्या सरी पडत आहेत. त्याचबरोबर देशात पूर्व राजस्थान, उत्तर गुजरात, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाच्या सरी पडल्या. मान्सून येथे दाखल होण्याबरोबरच त्याची पुढे प्रगती कशी होते, याबाबत उत्सुकता आहे. हवामान विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या अंदाजानुसार, केरळ किनारपट्टीवर मान्सून ५ जून रोजी दाखल हण्याची शक्यता आहे.