कोकण आणि विदर्भात मंगळवारी मुसळधार पाऊस पडला असून, त्याचा जोर पुढेसुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत. सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यांवरही संततधार पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणीसाठय़ात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोनतीन दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. कोकण, विदर्भात मंगळवारी त्याचा जोर होता. नागपूर येथे सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तब्बल १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय अमरावती (४८ मिलिमीटर), वर्धा (८५), गोंदिया (२३), अकोला (७) येथेही चांगला पाऊस पडला. कोकण-गोव्यात सर्वच ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली. या भागात मुंबई-कुलाबा (११९), अलिबाग (५७), रत्नागिरी (७४), डहाणू (१९), पणजी (४५) अशी नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात पुणे (३), कोल्हापूर (५), सांगली (३), सातारा (१), सोलापूर (५), तर मराठवाडय़ात उस्मानाबाद (२) येथे पाऊस झाला.
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांतही राज्यात अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.