करोना विषाणूच्या कहरातील टाळेबंदीमुळे बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, निसर्गचक्र अव्याहत सुरूच असते. टाळेबंदीसह उन्हाच्या वाढत्या झळा सोसणाऱ्या नागरिकांसाठी मोसमी पावसाची आणखी एक सुखवार्ता आली आहे. यंदा मोसमी पाऊस सरासरीइतका बरसणार असल्याचा अंदाज यापूर्वीच व्यक्त झाला असून, आता तो कधी येणार याचेही संकेत मिळाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने तो १६ मेपर्यंत अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागावर दाखल होऊ शकणार आहे.

राज्याच्या सर्वच ठिकाणी सध्या तापमानाचा पारा वाढलेला आहे. बहुतांश भागांत ढगाळ वातावरणामुळे उकाडय़ात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे आहे. कोकण विभागातही सरासरीच्या आसपास तापमानाची नोंद होत आहे. किमान तापमानातही वाढ कायम असून, त्यामुळे रात्री नागरिक घामाघूम होत आहेत. सध्या टाळेबंदी असल्याने बहुतांश गोष्टी ठप्प आहेत. मात्र, मोसमी पावसाच्या प्रवासासाठी सध्या कोणताही अडथळा नाही. सध्या तरी मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी अनुकूल स्थिती आहे.

पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम

गेल्या चोवीस तासांत विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. १५ मेपर्यंत विविध भागांत पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम आहे. १२ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. १३ ते १५ मे या कालावधीत प्रामुख्याने विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि मध्य महाराष्ट्रात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १४ मे रोजी कोकण विभागातही पावसाचा अंदाज आहे.