News Flash

क्रांतिवीर चापेकरांचे समूहशिल्प पूर्ण होणार तरी कधी?

पिंपरी पालिकेने पर्यायी जागा निवडून चिंचवडगावात चापेकर बंधूंच्या समूहशिल्पाचे काम सुरू केले. मात्र, सरकारी खाक्यामुळे तीन वर्षांपासून ते रखडलेलेच आहे.

चिंचवडच्या क्रांतिवीर चापेकर बंधूंनी २२ जून १८९७ ला रॅण्डला गोळ्या घालून यमसदनी पाठवला. ब्रिटिश सत्तेने त्यांना फासावर चढवले. त्यांच्या ऐतिहासिक कार्याची आठवण म्हणून चिंचवडच्या चौकाला चापेकर चौक असे नाव देत ६५ फूट उंच टॉवरवर त्यांचा पुतळा उभारण्यात आला. मात्र, रस्त्याला अडथळा ठरतो म्हणून कालांतराने तो हटवण्यात आला. पिंपरी पालिकेने पर्यायी जागा निवडून चिंचवडगावात चापेकर बंधूंच्या समूहशिल्पाचे काम सुरू केले. मात्र, सरकारी खाक्यामुळे तीन वर्षांपासून ते रखडलेलेच आहे.

चापेकर स्मारकाची जागा व रखडलेले काम

चिंचवडगावात सात रस्ते एकत्र येणाऱ्या चौकातील पिस्तुलधारी चापेकरांचा पुतळा ही गावची ओळख मानली जात होती. वाढत्या रहदारीमुळे या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय झाला. नंतर, पुलाच्या कामात अडथळा होतो म्हणून तो टॉवर काढण्यात आला व पुतळ्याचे अन्यत्र स्थलांतर करण्याचा निर्णय झाला. पर्यायी जागेवरून वाद झाला. मोरया मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मराठी शाळेची जागा निश्चित करण्यात आली, त्यासाठी शाळेच्या काही खोल्या पाडण्यात आल्या. चिंचवड ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, चापेकर स्मारक समिती, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी सामंजस्य दाखवले. त्यामुळे चापेकर पुतळ्याचे नवीन जागेत स्थलांतर करण्याचा मार्ग सुकर झाला. समूहशिल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला. २५ ऑगस्ट २०१० ला तत्कालीन महापौर योगेश बहल यांच्या हस्ते नव्या जागेचे भूमिपूजन झाले. तेव्हा सहा महिन्यात काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात प्रचंड विलंब होत गेल्याने पुतळ्याचे काम रखडले. अनेक विघ्न येऊनही पूल मात्र सुरू झाला. मात्र, पुतळ्याचे काम रखडत राहिले. वास्तविक उड्डाण पूल व चापेकर पुतळ्याचे काम एकाच वेळी पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, पालिकेचा कारभार पाहता तसे होणे शक्यही नव्हते.
चापेकरांच्या त्यागाला साजेसे असेच स्मारक असले पाहिजे, अशी सर्वाची भावना होती. दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर आणि महादेव गोविंद रानडे यांच्या पुतळ्यांचा समूहशिल्पात समावेश होता. मात्र, पुतळ्यांची उंची खूपच कमी असल्याचे नंतर दिसू लागले. त्यामध्ये आवश्यक ते बदल करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होऊ लागली. माजी स्वातंत्र्यसैनिक संघटनचे अध्यक्ष बाळकृष्ण पुराणिक, स्मारक समितीचे प्रमुख गिरीश प्रभुणे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे यांनी हा मुद्दा लावून धरला. आयुक्तांनी त्यानुसार अभ्यास केला व तज्ञांकडून माहिती घेतली. शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप चिंचवडे यांनी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. मनसेने वेळोवेळी आंदोलने केली. अखेर, या कामाला चालना मिळाली आहे. आयुक्तांनीही अंदाजपत्रकात पुतळ्यासाठी २५ लाख व चौथऱ्यासाठी २५ लाख अशी ५० लाखाची तरतूद करून ठेवली आहे. याबाबतचे काम युध्दपातळीवर सुरू असून ते अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
समूहशिल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात- मकरंद निकम
चापेकर स्मृती समूहशिल्पात नव्याने पुतळे व चौथरा उभारण्यास आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मान्यता दिली असून लवकरच काम सुरू होईल, असा विश्वास कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केला. बैठे व उभ्या पुतळ्यांची तसेच चौथऱ्याची उंची वाढवण्यात येणार असून त्यासाठी वेगवेगळ्या निविदा काढण्यात येणार आहेत. मागील बाजूस भारतमाताचे म्यूरल असणार आहे. संपूर्ण प्रकल्पाचा खर्च एक कोटीच्या घरात जाईल. आतापर्यंत १५ लाख खर्च झाले आहेत, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2013 2:50 am

Web Title: monument of chapekar waiting for completion from last 3 years
Next Stories
1 मिळकत कराच्या थकबाकीसाठी मनेसेचे पीएमपीसमोर बँड वादन
2 रिक्षा चालकांच्या कल्याणकारी मंडळाबाबत विधान परिषदेत घोषणा
3 जुन्नर तालुक्यातील अपंग कल्याण केंद्रातील बलात्कार झाल्याची तिसऱ्या मुलीची तक्रार
Just Now!
X