महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सोमवारी (२८ सप्टेंबर) होणारे चंद्रग्रहण दिसणार नाही. त्यामुळे नागरिकांनी ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी (२९ सप्टेंबर) ग्रहण करिदिन देखील मानू नये, असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सोमवारी सांगितले.
भाद्रपद पौर्णिमेस (२८ सप्टेंबर) होणारे चंद्रग्रहण ग्रस्तास्त आहे. भारत, मध्य आशिया खंड, आफ्रिका खंड, दक्षिण आणि उत्तर अमेरिका येथे हे चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतातील ग्रहण स्पर्श सकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी, मध्य सकाळी ८ वाजून १७ मिनिटांनी आणि ग्रहण मोक्ष सकाळी ९ वाजून ५८ मिनिटे असा आहे. हे ग्रहण भारताच्या फक्त पश्चिमेकडील काही प्रदेशात खंडग्रास दिसणार आहे. गुजरातमधील राजकोट, मोर्वी, जामनगर, जुनागढ, द्वारका, गोंडाल, भूज आणि राजस्थानमधील जैसलमेर या प्रदेशातून दिसणार आहे. या भागामध्ये हे ग्रहण ग्रस्तास्त असल्याने ग्रस्त झालेले चंद्रिबब अस्तास जाईल. ग्रहण मध्य आणि ग्रहण मोक्ष अवस्था दिसणार नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकासह उर्वरित भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही आणि दुसऱ्या दिवशी करिदिन देखील मानू नये, असे मोहन दाते यांनी सांगितले.