चिंचवड येथील मोरया गोसावी महोत्सव मंगळवारपासून सुरू होत असून यानिमित्ताने मोरया गोसावी देवस्थानच्या वतीने २ ते १२ डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र देव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (२ डिसेंबर) सायंकाळी साडेचार वाजता भैयू महाराज यांच्या हस्ते होणार आहे. समाधी मंदिराच्या पटांगणात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे असून आयुक्त राजीव जाधव प्रमुख पाहुणे आहेत. महोत्सवात जिल्ह्य़ातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात येणार आहे. गुरूवारी (११ डिसेंबर) सायंकाळी मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतील. वडकी येथील दिव्यवाटिका आश्रमाचे स्वामी विद्यानंद यांना अतुलशास्त्री भगरे यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय, निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘मोरया’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. महोत्सवात दररोज सकाळी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून चिंचवड गावठाण परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे.