पालकांच्या पुढाकारातून अभिनव संकल्पना

मुलांची अभ्यासविषयक जिज्ञासा वाढवण्यासाठी, त्यांना शिकणासाठी प्रेरित करण्यासाठी काही पालकांनी पुढाकार घेतला आहे. पालकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘गंमतघर’ हा उपक्रमातून भाषा, गणित, विज्ञान असे विषय मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावले जाणार आहेत. कृतियुक्त शिक्षण, संवाद, खेळ यातून विद्यार्थ्यांच्या आकलनवृद्धीवर भर देण्याची गंमतघराची कल्पना आहे.

योगेश ढगे, मनीषा मुळे, तन्वी कुलकर्णी या पालकांनी इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गंमतघर’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.  अनेक मुलांना गणिताची भीती वाटते, विज्ञानाचा कंटाळा येतो, संज्ञा कळत नाहीत. मात्र, दैनंदिन जीवनातील उदाहरणांतून, मनोरंजक खेळांतून गणित आणि विज्ञान समजावून देत या विषयांची गोडी लावली जाणार आहे. मुलांना काहीही न शिकवता प्रत्यक्ष अनुभवांतून, संवादातून शिकण्यासाठी प्रेरित करण्याची ही अभिनव कल्पना आहे. या उपक्रमांतर्गत शालेय शिक्षणाबरोबरच मुलांना लेखक, सामाजिक कार्यकर्ते, अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींशी प्रत्यक्ष संवादही साधायला मिळेल. या उपक्रमात लेखक राजीव तांबे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

‘मुले शाळेचा, अभ्यासाचा कंटाळा का करतात, याचा विचार करताना त्यांची जिज्ञासा कमी होत आहे का, असा प्रश्न आम्हाला पडला. त्यामुळे काही वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यासाची, विषयांची आणि एकूणच शिक्षणाची गोडी लावता येईल का, याचा विचार करणे आवश्यक वाटले. त्यातून गंमतघर ही कल्पना पुढे आली.  शनिवार-रविवारी हा उपक्रम करण्यात येईल. त्यासाठी प्रवेश शुल्क नाही. अनुषंगिक खर्च (प्रयोगाचे साहित्य) पालकांना करावा लागेल,’ असे योगेश ढगे यांनी सांगितले.