उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३७७ पदांसाठी घेतलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल नुकताच जाहीर केला. राज्य शासनाच्या समांतर आरक्षणासंदर्भात शुद्धिपत्रकातील तरतुदीनुसार हा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षा १६ ते १८ सप्टेंबर २०१७ रोजी घेण्यात आली होती. त्यात जळगाव जिल्ह्य़ातील रोहितकुमार राजपूत हे राज्यातून प्रथम आले. सोलापुरातील अजयकुमार नष्टे हे मागासवर्गीय गटातून, तर पुणे जिल्ह्य़ातील रोहिणी नऱ्हे या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या. सविस्तर निकाल आणि पदनिहाय प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

राज्य सेवा पूर्वपरीक्षा २ एप्रिल २०१७ रोजी घेण्यात आली होती. या पूर्वपरीक्षेसाठी १ लाख ९८ हजार ५९९ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यातून राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ८३९ उमेदवार पात्र ठरले होते. त्यातून लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी १ हजार १९४ उमेदवार पात्र ठरले होते.

काही दिवसांपूर्वी या ३७७ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती न मिळाल्याने आंदोलन करण्यात आले होते. आता एमपीएससीने सुधारित निकाल जाहीर केल्यामुळे आता या उमेदवारांना नियुक्ती मिळू शकणार आहे.