राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल ‘पर्सेटाईल’ पद्धतीने जाहीर करण्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कल्पना फळाला आली असून मुख्य परीक्षेतून १ हजार ९७ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, परीक्षेचे कट ऑफ गुण अगदी २१ टक्क्य़ांपर्यंत खाली आले आहेत.
राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेतून १ हजार ९७ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. साधारण तिनशे पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी मुख्य परीक्षेचा निकाल प्रथमच पर्सेटाईल पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. जेवढी पदे असतील त्याच्या तिप्पट उमेदवार मुलाखतीसाठी निवडण्याचा आयोगाचा संकेत आहे. मात्र, गेल्या वर्षी किमान गुणांच्या अटीमुळे एकास तीन प्रमाणात उमेदवार मिळाले नव्हते. त्यामुळे यावर्षी किमान गुणांची अट काढून पर्सेटाईल पद्धत वापरून निकाल जाहीर करण्याची शक्कल आयोगाने लढवली. प्रत्येक प्रवर्गामधील सर्वोत्तम गुण हे शंभर टक्के मानून त्याच्या ३५ टक्के किंवा ३० टक्के उमेदवार पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी जागांच्या अनुषंगाने तिप्पट उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र, या पद्धतीचा परिणाम गुणवत्तेवर झालेला दिसत आहे. अगदी २१ टक्के गुण मिळालेले विद्यार्थीही मुलाखतीला पात्र ठरले आहेत.
परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गाचे कट ऑफ गुण हे ८०० पैकी ३६४ आहेत म्हणजेच ४५.५ टक्के गुण मिळालेला उमेदवार पात्र ठरला आहे. खुल्या गटातील महिला प्रवर्गाचा कॉट ऑफ ३९.३७ टक्के आहे. ओबीसी वर्गातील खेळाडूंचा कट ऑफ तर २१.१२ टक्क्य़ांपर्यंत घसरला असून ८०० पैकी १६९ गुण मिळालेले उमेदवार पात्र ठरले आहेत. इतर सर्व प्रवर्गातील पात्र ठरलेल्या उमेदवारांची टक्केवारी ही ३५ टक्क्य़ांच्या जवळपास आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती ६ जानेवारीपासून सुरू होणार आहेत.
पुणे विभागातील सर्वाधिक उमेदवार पात्र
पुणे विभाग-  ६४० उमेदवार पात्र, औरंगाबाद – २६१ उमेदवार पात्र, नागपूर – ७४ उमेदवार पात्र, मुंबई – १२२ उमेदवार पात्र.