News Flash

सांगवीतील प्रल्हाद टकले यांची निरपेक्ष सेवा

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी टकले पोलिसांना सहकार्य करत आहेत याचे कौतुक वाटते. विशेष म्हणजे गेली दहा वर्ष ते निरपेक्ष भावनेने काम करत आहेत.

पुणे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. बेशिस्त वाहतुकीवर प्रत्येक जण टीका करतो. परंतु सांगवी परिसरात राहणारे प्रल्हाद ज्ञानदेव टकले हे गेली दहा वर्ष गजबजलेल्या बाणेर फाटा चौकात दररोज सायंकाळी वाहतूक नियमन करत आहेत. एका खासगी कंपनीत चालक म्हणून ते काम करतात. कोणतीही अपेक्षा न बाळगणाऱ्या टकले यांनी वाहतूक नियमनाचा ध्यास घेऊन मोठय़ा उत्साहाने हे काम सुरू केले आणि त्यातून त्यांनी एकटेपणावरही मात केली.
बाणेर फाटा चौकात दररोज सायंकाळी साडेपाच ते रात्री नऊ या वेळेत प्रल्हाद टकले हे वाहतुकीचे नियमन करतात. ते त्रेपन्न वर्षांचे आहेत. एका खासगी कंपनीत चालक असलेले टकले यांच्या पत्नीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त बारामती येथे स्थायिक झाला असून विवाहित मुलगी वालचंदनगर येथे असते. पत्नीच्या निधनानंतर टकले यांना एकाकीपण जाणवत होते. कामावरुन सुटल्यानंतर काय करायचे असा प्रश्नही त्यांच्यापुढे होता. स्वत: चालक असल्यामुळे त्यांना पुण्यातील वाहतुकीच्या समस्येची जाण होती. त्यातून वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिसांना मदत करु या, असा विचार त्यांच्या मनात आला.
दररोज बाणेर फाटा रस्त्याने ते दुचाकीवरुन सांगवी येथे जायचे. बाणेर फाटा चौकात आपण वाहतूक पोलिसांना मदत करू या असा विचार त्यांनी केला. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली आणि बाणेर फाटा चौकात वाहतूक नियमनाचे काम टकले यांनी सुरु केले. गेली दहा वर्षे ते दररोज सायंकाळी बाणेर फाटा चौकात वाहतूक नियमन करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करत आहेत. विशेष म्हणजे या कामापोटी त्यांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षादेखील ठेवली नाही.
‘‘मी एका खासगी कंपनीत चालक आहे. सकाळी सात वाजता मी कामावर हजर होतो. मी स्वत: चालक असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांची जाण आहे. दिवसभर रस्त्यावर असल्याने पुण्यातील वाहतुकीच्या समस्येची मला जाणीव होती. नियम न पाळल्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघातांना  निमंत्रण मिळते, असा माझा अनुभव आहे. पत्नीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. मुले मोठी झाल्यानंतर ती बाहेरगावांत स्थिरावली. कामावरुन सुटल्यानंतर मी घरी एकटा असायचो. आपण समाजासाठी काही तरी केले पाहिजे, या विचाराने मी पोलिसांना वाहतूक नियमनात मदत करण्याचे ठरवले,’’ असे टकले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक क्रांती पवार, सहायक निरीक्षक विमल बिडवे, हवालदार कांबळे, सोनवणे, देवकर, शिंगे आणि वॉर्डन हत्ते यांनी त्यासाठी सहकार्य केले. सध्या वाहतूक शाखेच्या चतु:श्रुंगी विभागाचे पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे काम सुरु आहे. या कामाच्या माध्यमातून बाणेर परिसरातील अनेक नागरिकांशी माझी वैयक्तिक ओळख झाली असून बाणेर फाटा चौकात एक दिवस जरी मी गैरहजर राहिलो तरी वाहनचालक आस्थेने नंतर चौकशी करतात, असाही अनुभव त्यांनी सांगितला.

वाहतूक पोलिसांची संख्या पुरेशी नाही. रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियमन करणे हे सोपे काम नाही. बेशिस्त वाहनचालक नियम मोडतात आणि पोलिसांशी वाद घालतात. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी टकले पोलिसांना सहकार्य करत आहेत याचे कौतुक वाटते. विशेष म्हणजे गेली दहा वर्ष ते निरपेक्ष भावनेने काम करत आहेत.
सारंग आवाड, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2016 3:15 am

Web Title: mr takles remarkable work regarding traffic controlling
Next Stories
1 नाटय़मय घडामोडीनंतर पिंपरीत स्थायी समिती अध्यक्षपदी डब्बू आसवानी
2 एक कोटीचा थकीत कर भरल्यावर ‘अॅम्बी व्हॅली’वरील कारवाई स्थगित
3 दौंडजवळ चोरट्यांचा हल्ल्यात मायलेकी जखमी, रेल्वेप्रवासी पुन्हा लक्ष्य
Just Now!
X