मुंबई- पुणे एक्स्प्रेस- वे आज (गुरुवारी) दोन तास बंद राहणार आहे. मुंबईकडे जाणारा मार्ग दोन तास बंद करण्यात येणार असून दुपारी १२ ते २ या वेळेत हा मार्ग बंद असेल. या कालावधीत किलोमीटर क्र. १० जवळ दिशादर्शक फलक आणि ओव्हरहेड गंट्री बसविण्याचे काम रस्ते विकास महामंडळाच्या वतीने केले जाणार आहे.

रस्ते विकास महामंडळाच्यावतीने एक्स्प्रेस वेवर बहुउद्देशीय कमानी उभारण्याचे काम सुरू असून याचा वापर डिजिटल संदेश यंत्रणेसाठी केला जाणार आहे. गुरुवारी या कामासाठी मुंबईकडे जाणारा मार्ग दोन तासांसाठी बंद केला जाणार आहे. खालापूरजवळ हे काम केले जाणार आहे. या कालावधीत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून अवजड वाहने खोपोली फुडमॉल जवळ थांबविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.

हा असेल पर्यायी मार्ग

एक्स्प्रेस वेवरील वाहतूक खालापूर टोल नाका-खालापूर गाव- खालापूर टोलनाका मार्गे चौक फाटा-दौंड फाटा-शेडुंग टोल-अजीवली फाटा ते परत पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग अशी वळविण्यात येणार आहे.