मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर घाटाच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या मध्य रेल्वेच्या निर्णयाचा मोठा फायदा झाला आहे. गुरुवारी रात्री रेल्वे मार्गावर भलामोठा दगड येऊन पडला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दगड कोसळण्याच्या घटनेबद्दल आगाऊ माहिती कळली. त्यामुळे ट्रेन या दगडाला धडकण्याआधीच थांबवण्यात आली. हा दगड २.३ मीटर लांब, १.६ मीटर उंच आणि २.२ मीटर रुंद होता.

ट्रेन या दगडाला धडकली असती तर मोठे नुकसान झाले असते. लोणावळयाजवळच्या रुळावर ८.१५ च्या सुमारास हा दगड पडला. त्यावेळी या मार्गावरुन जाणारी मुंबई-कोल्हापूर सहयाद्री एक्सप्रेस दोन तास थांबवून ठेवण्यात आली होती. खंडाळयामध्ये मंकी हिलजवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दगड कोसळण्याची ही घटना कैद झाली. रात्री १०.३० च्या सुमारास सहयाद्री एक्सप्रेसने कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केले.

अपघात टाळण्यासाठी या घाट मार्गावर सीसीटीव्ही कॅमेर बसवण्यात आले आहेत. कर्जत-लोणावळयामधील घाट मार्गावर नियमित तपासणी सुरु असते. मंकी हिल-खंडाळा घाटा दरम्यान १२ किलोमीटरच्या मार्गावर ४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. घसरणाऱ्या दगडांमुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात त्यामुळे मध्य रेल्वेने ड्रोनच्या सहाय्याने या मार्गाचे सर्वेक्षणही केले आहे. २०१७ मध्ये दरड कोसळण्याच्या तीन घटना घडल्या. पण सुदैवाने मोठी जिवीतहानी झाली नव्हती.