कात्रज भागातील महापालिकेतील दोन शिक्षकांनी शाळेतील पंचवीस विद्यार्थिनींसोबत असभ्य वर्तन केल्याची माहिती उघडकीस आली आहे. पुणे पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाकडून विविध शाळांमध्ये लैंगिक शोषणाबाबत जनजागृती केली जात आहे. त्याअंतर्गत कात्रज भागातील विद्यार्थिनींशी चर्चा केली असता ही बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

महिला सहाय्य कक्षातील पोलीस अधिकाऱ्यांनी नुकतीच कात्रज भागातील शाळेला भेट दिली. त्यावेळी पंचवीस विद्यार्थिनींनी दोन शिक्षकांबाबत तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली. त्या दोन शिक्षकांना बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्तालयात बोलावले. त्यांची चौकशी केली. त्यावेळी विद्यार्थिनींना बोलाविण्यात आले होते. मात्र, तक्रार देण्यास चार विद्यार्थिनी पुढे आल्या आहेत. उर्वरित विद्यार्थिनींनी तक्रार दिली नाही. अद्याप याप्रकरणी शिक्षकांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही. शिक्षकांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.