मार्गासह पायाभूत सुविधा उभारणीचा खर्चही महापालिकेवर

शहराच्या जुन्या हद्दीतून जाणाऱ्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट- एचसीएमटीआर) हजारो कोटी रुपयांचा निधी उभारणीसाठी मार्गाच्या दोन्ही बाजूला पाचशे मीटर अंतरावर चार चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) देण्याचे प्रस्तावित असले तरी हा मार्ग ‘उन्नत’ असल्यामुळे एफएसआयमधून अपेक्षित निधी मिळेल का, याबाबतच साशंकता आहे.

या मार्गाभोवती लोकसंख्येची घनता वाढेल असे गृहीत धरले तरी येथील लोकसंख्येसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आराखडा महापालिकेने केलेला नाही. पाणी, घनकचरा, सांडपाणी यांचे प्रश्न त्यामुळे निर्माण होणार असून त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च महापालिकेलाच करावा लागणार आहे. त्यामुळे एफएसआय किंवा टीओडी (ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलमेंट- टीओडी) निर्माण करण्याचा प्रस्तावही वादग्रस्त ठरणार आहे.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा वर्तुळाकार मार्ग उभारणीसाठी ५ हजार १९२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यातच मार्गाच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदा ४५ टक्के चढय़ा दराने आल्या आहेत आणि राज्य शासनाने निधी देण्यास असमर्थता दर्शविली आहे. या पाश्र्वभूमीवर मार्गाच्या पाचशे मीटर अंतराच्या दोन्ही बाजूला चार एफएसआय दिल्यामुळे मोठा निधी उपलब्ध होईल, असा दावा महापालिकेतील सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र एफएसआयमुळे दुहेरी खर्च महापालिकेलाच सहन करावा लागणार असून काही प्रश्नही उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

मुळातच ३६.६ किलोमीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदीचा हा वर्तुळाकार मार्ग संपूर्ण उन्नत आहे. हा मेट्रोसारखा सार्वजनिक प्रकल्प नाही. या मार्गावर दुचाकींना पूर्णपणे बंदी असून दुचाकींसाठी रॅम्प प्रस्तावित आहे. खासगी वाहनेही या रस्त्यावरून धावणार असल्यामुळे मार्गही गजबजलेला राहणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्प उभारले जातील, याची हमी नाही. त्यामुळे एफएसआयतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मार्गातील आखणीतील बदलांमुळे या परिसरात सिमेंटची जंगले उभी राहिली आणि लोकसंख्येची घनता वाढली असे गृहीत धरले तरी येथील लोकसंख्येला पिण्याचे पाणी, घनकचरा, सांडपाणी, वाहनतळ, दवाखाने, मंडई, क्रीडांगणे आदी सुविधांचे जाळे करावे लागणार आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. त्यामुळे एफएसआयच्या माध्यमातून निधी उभा राहिला तरी दुसऱ्या बाजूने तो जाणार आहे. त्यामुळे वर्तुळाकार मार्ग हा आर्थिकदृष्टय़ा अव्यवहार्यच ठरण्याची शक्यता आहे.

खर्च आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता

महापालिका हद्दीत अकरा गावांचा समावेश झाला आहे. या गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला किमान साडेसात हजार कोटी रुपये लागणार आहेत. महापालिकेनेच तसा अहवाल तयार केला आहे. त्यातच मेट्रो मार्गिकेभोवतीही सिमेंटचे जंगल उभे राहणार आहे. तेथेही महापालिकेला पायाभूत सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. सध्या महापालिकेचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हा खर्च महापालिकेच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता असून शहर बकाल होण्याची शक्यता अधिक आहे.

‘निर्णय व्यावहारिक नाही’

वर्तुळाकार मार्गासाठी एफएसआय देण्यात येणार असला तरी त्याबाबतचा निर्णय व्यावहारिक नाही. नागरी सुविधांचा कोणताही आराखडा महापालिकेकडे नाही. त्या सुविधांसाठी कोटय़वधी रुपये लागतील. हा खर्च कसा करणार, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण महापालिकेकडून देण्यात आलेले नाही. मुळातच, हा प्रकल्प सार्वजनिक नाही. बीआरटीचा समावेश मार्गात केला असला तरी त्यासाठी दोन मार्गिका आहेत. रात्री खासगी वाहनांनाही या मार्गामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे एफएसआय किंवा टीओडी क्षेत्र जाहीर करणे फायदेशीर नाही, असे एचसीएमटीआर नागरिक कृती समितीच्या सुषमा दाते, आशुतोष प्रधान, पुष्कर कुलकर्णी यांनी सांगितले.