पैशासाठी दोन सराईतांनी केला खून

जनता वसाहतीतील वाघजाई मंदिराजवळ मागील आठवडय़ात झालेल्या अनोखळी व्यक्तीच्या खुनाचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अनोखळी व्यक्तींसोबत दारू पिण्यासाठी गेल्यानंतर पैशासाठी दोन सराईतांनी हा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. खून झालेली व्यक्ती ही लष्करामध्ये लान्स नाईक पदावर कार्यरत होती.

पोलिसांनी या प्रकरणी प्रतीक अशोक हाके (वय २९, रा. ४४२, नाना पेठ) व अमित प्रफुल्ल सदनकर (वय २९, रा. रास्ता पेठ) या दोघांना अटक केली आहे. संजय लक्ष्मण लवंगे (वय ३९, रा. पोफळी, ता. मोताळ, जि. बुलढाणा) असे खून झालेल्या लष्करी जवानाचे नाव आहे. २० मे रोजी जनता वसाहतीतील वाघजाई मंदिराजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. खुनाचा गुन्हा दाखल करून दत्तवाडी पोलिसांकडून त्याचा तपास करण्यात येत होता.

पोलिसांना घटनास्थळी दारुच्या बाटल्या मिळाल्या होत्या. त्या बाटल्यांवरील बॅच क्रमांकावरून पोलिसांनी माहिती घेतली. बाटल्या कोणत्या दुकानातून विकल्या गेल्या, याची माहिती या क्रमांकावरून घेण्यात आली. दुकान सापडल्यानंतर तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. दारु विकत घेताना आरोपी सीसीटीव्ही चित्रीकरणात कैद झाले होते.

त्यावरून पोलिसांनी हाके याचा शोध घेतला. कोंढवा भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता सदनकर व आपण हा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली.

आरोपी बुधवार पेठेत एका ठिकाणी दारू पित बसले होते. लवंगे यांची त्यांच्याशी ओळख नव्हती. मात्र, दोघांना त्यांनी दारू पाजण्यासाठी एटीएममधून हजार रुपये काढले व तिघांनी दारू विकत घेतली. जनता वसाहत येथे दारू पित असताना लवंगे यांच्या खिशातून एटीएम कार्ड पडले. ते आरोपींनी ताब्यात घेतले व लवंगे यांना एटीएमचा पासवर्ड विचारला. त्याला नकार दिल्याने आरोपींनी बाटल्यांनी डोक्यात प्रहार करीत लवंगे यांचा खून केला. पेट्रोल टाकून त्यांनी चेहराही जाळला. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. मारामारी व चोरीचे विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, कर्मचारी किशोर शिंदे, तानाजी निकम, अशोक गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.