महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या दुचाकीस्वार शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी केली. अंदुरे आणि कळसकर यांना मदत करण्यासाठी दोघे जण आधीच येऊन घटनास्थळी थांबले होते, असा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) शनिवारी न्यायालयात करण्यात आला.

या प्रक रणात अटकेत असलेला संशयित हल्लेखोर शरद कळसकर याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला सीबीआयच्या पथकाने शनिवारी न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी कळसकरच्या सीबीआय कोठडीत १७ सप्टेंबपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. कळसकरची चौकशी करण्यात आली. तेव्हा अंदुरे आणि कळसकर यांना डॉ. दाभोलकर कोण होते, याची माहिती नव्हती. त्यांची माहिती देण्यासाठी २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासात वाजता शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आणखी दोघे जण थांबले होते. कळसकर आणि अंदुरे दोघे जण दुचाकीवरून तेथे आले. तेव्हा घटनास्थळी आधीच थांबलेल्या दोघांनी त्यांना डॉ. दाभोलकरांची माहिती दिली, असा दावा सीबीआयचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. विजयकुमार ढाकणे यांनी युक्तिवादात केला.

खात्री पटल्यानंतर अंदुरे आणि कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. घटनास्थळी थांबलेले आणखी दोघे जण कोण होते, याबाबत सीबीआयकडून तपास करण्यात येत आहे.

चार पिस्तुलांची विल्हेवाट

वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी चार पिस्तुलांची विल्हेवाट लावली आहे.२३ जुलै रोजी २०१८ रोजी त्यांनी पिस्तुलांची मोडतोड केली. पिस्तुलाचे तुकडे मुंबईतील खाडी पुलावरून खाली टाकून देण्यात आले.  कळवा, भाईंदर येथील खाडी पुलावरून पिस्तुलाचे तुकडे टाकून देण्यात आल्याचा संशय आहे, यादृष्टीने तपास करायचा असल्याचे सीबीआयने सांगितले.