२१ फ्रेंच चित्रपट मासिकांचा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. कवी आणि संपादक आदिल जुस्सावाला यांच्या वैयक्तिक संग्रहातून हा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाला आहे. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी याबाबतची माहिती दिली.

१९७० आणि १९८० च्या दशकातील ही फ्रेंच भाषेतील मासिके आहेत. ला रव्यू दा सिनेमा, एक्राँ, ल न्यूवो सिनेमॉन्द या मासिकांचे १२१ अंक जुस्सावाला यांच्या संग्रहातून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाले आहेत.

प्रकाश मगदूम म्हणाले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी आलेल्या अनेक मोलाच्या वस्तूंमध्ये या फ्रेंच चित्रपट मासिकांनी भर घातली आहे. या अंकामधून त्या काळातील चित्रपट जगताचा मागोवा घेणे शक्य झाले आहे.  ही मासिके जागतिक चित्रपटांच्या पटलावरील अनेक लोकप्रिय अभिनेत्यांच्या छायाचित्रांनी सजली असून ताकाशी शिमोरा, काथरिन दनव, अल पाचिनो यांची छायाचित्रे या मासिकांमध्ये पहायला मिळतात. ही मासिके ७० आणि ८० च्या दशकातली असून देखिल  १९२९ मधील मॅन विथ द मूव्ही कॅमेरा आणि १९५२ मधील इकिरा या जुन्या चित्रपटांवरील लेखांचा समावेश या मासिकांमध्ये दिसून येतो.

कवी आणि संपादक आदिल जुस्सावाला यांच्या संग्रहातील १२१ फ्रेंच चित्रपट मासिके राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी देण्यात आली आहेत.