राष्ट्रीयीकृत बँकांच्या एक दिवसाच्या संपामुळे नागरिकांनी बुधवारी मोठय़ा गैरसोईचा अनुभव घेतला. बँकांच्या बुडित व थकित कर्जाची वसुली करावी आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर गेले होते.
‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ या संघटनेतर्फे बँक ऑफ महाराष्ट्रच्या केंद्रीय कार्यालयात पगारवाढीच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.
‘नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स’चे राष्ट्रीय सचिव मधु सातवळेकर म्हणाले, ‘‘२५ टक्के  पगारवाढीची बँक कर्मचाऱ्यांची मागणी असून ११ टक्क्य़ांपेक्षा अधिक पगारवाढ होऊ शकत नसल्याचे ‘इंडियन बँक असोसिएशन’चे म्हणणे आहे. बँका अनुत्पादक कर्जे वाढत असल्याचा बागुलबुवा दाखवून जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र अनुत्पादक कर्जापैकी ८० टक्के कर्जे मोठे कर्जदार व औद्योगिक घराणी यांना देण्यात आली आहेत. या कर्जाची वसुली करणे गरजेचे असून त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचीही आवश्यकता आहे. ही कर्जवसुली होऊ शकली तर २५ टक्केच काय, ४० टक्के पगारवाढ देखील देता येऊ शकेल. बँकिंग उद्योगाच्या विद्यमान परिस्थितीतही कर्मचाऱ्यांची पगारवाढीची मागणी परवडण्यासारखी आहे.’’ दीपक पाटील, राजीव ताम्हाणे, डॉ. सुनील देशपांडे, विश्वास जाधव आदी उपस्थित होते.