आदेश धुडकावून पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

पुणे : करोनाच्या संसर्गात आदेश धुडकावून शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनास झालेल्या गर्दी प्रकरणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सहाजणांना सोमवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर सहाजणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

आदेश धुडकावल्याप्रकरणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक अध्यक्ष महेश हांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, नीलेश निकम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे यांना अटक करण्यात आली. जगताप, हांडे, देशमुख, निकम, बोडके, पायगुडे यांना अटक करून हजर करण्यात आले. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलिमा पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (१९ जून)  पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यास आदेश धुडकावून पक्ष कार्यकर्त्यांनी गर्दी करून शक्तिप्रदर्शन केले होते.