पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांना राष्ट्रवादीचा सूचक इशारा

भाजपचा फसवेपणा वेळोवेळी उघड झाला आहे. मतदारांनी भाजपला नाकारल्याचे तीन राज्याच्या निकालाने पुन्हा दिसून आले आहे. जे बोलतात, ते भाजपवाले करत नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादी सोडून भाजपच्या वाटेवर असणाऱ्या नगरसेवक तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी योग्य तो विचार करावा, असे सूचक आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी गुरूवारी केले आहे.

राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाची ६० जणांची ‘जम्बो’ शहर कार्यकारिणी वाघेरे तसेच त्या विभागाचे अध्यक्ष विनोद कांबळे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली, तेव्हा ते बोलत होते. वाघेरे म्हणाले, पक्ष बदलून प्रश्न सुटत नाहीत. पक्षाशी, नेत्यांशी निष्ठेने राहिले पाहिजे. ज्यांना पद दिले, तेच पक्ष सोडून जात आहेत. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यावर भाष्य करून उपयोग नाही. आणखी काही नगरसेवक भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत, त्यांची नावे आम्हाला माहिती आहेत. त्यांना राष्ट्रवादीने मोठे केले, हे जनतेलाही माहिती आहे. लोकांचा भाजपवर विश्वास राहिलेला नाही, त्यांचे खरे स्वरूप बाहेर आले आहे. या सर्व गोष्टींचा विचार भाजपमध्ये जाऊ इच्छिणाऱ्यांनी करावा, असे वाघेरे म्हणाले.