पिंपरीतील तीन विधानसभेच्या जागांसाठी उमेदवारांची शोधाशोध

पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती आहे. पिंपरीतील तीन मतदार संघांपैकी एक जागा काँग्रेसला हवीच आहे. तर, तीनही जागा लढवण्यावर राष्ट्रवादी ठाम आहे. त्यामुळे जागावाटप आणि संभाव्य उमेदवारी यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये गोंधळाची परिस्थिती दिसून येते.

शहरात चिंचवड, पिंपरी आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. गेल्या वेळी (२०१४) काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी नसल्याने तीनही ठिकाणी दोन्ही काँग्रेसचे उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध लढले होते. तीनही मतदार संघांत महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते. बलाढय़ भाजप-शिवसेनेशी स्वतंत्रपणे न लढता राज्यपातळीवर निवडणूकपूर्व आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसने घेतला आहे. त्यानुसार जागावाटपासंदर्भात त्यांच्या बैठका सुरू आहेत. पिंपरीतील तीनपैकी एका जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. तर, तीनही जागा लढवण्याचा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये यापुढे ताणतणाव होणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

पिंपरीत एके काळी काँग्रेसचे वर्चस्व होते. नंतर, राष्ट्रवादीचा प्रभाव निर्माण झाला. आता दोन्ही काँग्रेसची परिस्थिती नाजूक असून भाजप-शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. महायुतीकडे तगडे उमेदवार आहेत. त्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाहीत. त्या दृष्टीने शोधाशोध सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे. गुरुवारी (१८ जुलै) अजित पवार शहरात आहेत. त्यांच्या उपस्थितीत पुढील चर्चा अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

पिंपरीतील तीनही जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी पूर्णपणे तयारीत आहे. काँग्रेसने अद्याप आमच्याकडे जागेची मागणी केली नाही. त्यामुळे त्यांना मतदार संघ सोडण्याविषयी चर्चा झालेली नाही. आमच्यात गोंधळाची परिस्थिती बिलकूल नाही.

– संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, पिंपरी राष्ट्रवादी

पिंपरीतील एक जागा काँग्रेसला हवीच आहे. काँग्रेसच्या आढावा बैठकीत आम्ही ही मागणी केली आहे. राष्ट्रवादीशी वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर जागावाटपासंदर्भात बोलणी होईल.

– सचिन साठे, शहराध्यक्ष, पिंपरी काँग्रेस