News Flash

चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा दिवसाढवळ्या खून

नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्यावर चाकूने हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

| September 4, 2015 02:20 am

िपपरी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड-मोहननगर प्रभागातील नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्यावर गुरुवारी दुपारी अज्ञात आरोपींनी राहत्या घराजवळ डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकूने हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या टेकवडे यांच्यावर विविध प्रकारचे सात गुन्हे दाखल होते.
टेकवडे यांचा दिवसाढवळ्या खून झाल्यानंतर चिंचवड परिसरात प्रचंड तणाव पसरला. पूर्ववैमन्यातून हा हल्ला झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दुपारी टेकवडे प्रभागात फेरफटका मारून घरी आले. जिन्यावरून घरात जात असताना दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर, त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. टेकवडे यांचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर पळाले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेतील टेकवडेंना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी सोसायटीच्या उंच िभतीवरून उडय़ा टाकून पळून गेले. या प्रकरणी टेकवडे यांच्या पत्नी सुजाता (वय ३३, रा. गणेश आंगन, मोहननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून दोन आरोपींनी हल्ला केल्याचे
फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळावर पोलिसांना चाकू, मिरचीची पूड, नंबरप्लेट नसलेली संशयित दुचाकी सापडली आहे. अपर पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल, उपायुक्त पी. आर. पाटील, बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते, राजेंद्र जोशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. टेकवडे यांच्या खुनाचे वृत्त पसरताच चिंचवड परिसरात तणाव निर्माण झाला. मोहननगर येथील दुकाने बंद करण्यात आली. पोलिसांनी या भागातील बंदोबस्त वाढवला. या संदर्भात, पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले, टेकवडे यांच्यावर दोन जणांनी हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तपासासाठी सहा पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपी लवकरच गजाआड झालेले असतील.
….
नगरसेवक या नात्याने मोहननगर परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम अविनाश टेककडे यांनी हाती घेतले होते. त्यांच्या घराजवळही सीसीटीव्ही बसवले जात होते. काही दिवसांतच त्याचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात येणार होते. तथापि, त्या आधीच टेकवडे यांचा मृत्यू झाला. गुरुवारी विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे लिफ्ट बंद होती म्हणून ते जिन्याने गेले होते आणि तेव्हाच त्यांच्यावर हल्ला झाला.
….
अविनाश टेकवडे मूळचे कोकण भागातील आहेत, याच ‘कोकण कनेक्शन’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे ते निकटवर्तीय होते. २००२ मध्ये राष्ट्रवादीने त्यांना सर्वप्रथम उमेदवारी दिली होती, तेव्हा भाजपचे राजू दुर्गे निवडून आले. २००७ च्या निवडणुकीत टेकवडे यांच्याविरुद्ध अपक्ष मारुती भापकर निवडून आले. २०१२ मध्ये राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली, तेव्हा भापकर यांचा पराभव करून ते प्रथमच नगरसेवक झाले. त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते. २०१३ मध्ये अशाच प्रकारे राहत्या घराजवळ त्यांच्यावर हल्ला झाला होता. मात्र, तो बनाव असावा. टेकवडे यांना पिस्तूलसाठी पोलीस परवाना हवा होता, त्याकरिता हे नाटय़ घडवले असावे, असा संशय पोलिसांनी तेव्हा व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 2:20 am

Web Title: ncp corporator avinash tekwade murder pimpri
Next Stories
1 चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची हत्या
2 पुण्यात एक वेळ पाणीपुरवठा
3 कार्यालयांत शुकशुकाट; बाहेर निदर्शने!
Just Now!
X