अपक्ष नगरसेवकाचे नेत्यांना साकडे; राष्ट्रवादीने इच्छुकांचे अर्ज मागविले

गेल्या वेळी तिकीट दिले नाही म्हणून बंडखोरी केली. आता या वेळी तरी अधिकृत ‘घडय़ाळ’ द्या. पुन्हा ‘टीव्ही’ किंवा ‘कपबशी’ चिन्ह घ्यायला लावू नका, या शब्दात िपपरीतील एका अपक्ष नगरसेवकाने राष्ट्रवादीच्या बैठकीत शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासमोर आपल्या भावना सूचकपणे व्यक्त केल्या. दरम्यान, आगामी  निवडणुकीसाठी शहराध्यक्षांनी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभागनिहाय बैठका सुरू आहेत. त्याअंतर्गत, मासूळकर कॉलनी येथे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी नेहरूनगर-खराळवाडी-मासूळकर कॉलनी प्रभागातील इच्छुकांची चाचपणी करण्यात आली. माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर महंमद पानसरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, फजल शेख, नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, सविता साळुंके आदी या वेळी उपस्थित होते. इच्छुकांकडून प्रभागाविषयी सविस्तर माहिती विचारण्यात येत होती. गेल्यावेळी पक्षातील गटबाजीमुळे उमेदवारी कापलेल्या मासूळकरांनी या वेळी मनातील खंत व्यक्त केली. आतातरी अधिकृत उमेदवारी द्या, असे सांगताना त्यांनी दिलेल्या उदाहरणामुळे बैठकीत हशा पिकला.

दरम्यान, राष्ट्रवादीने इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले आहेत. २५ नोव्हेंबरपासून सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पक्षकार्यालयात अर्ज उपलब्ध होणार आहेत. तीन डिसेंबर ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे, असे वाघेरे यांनी कळवले आहे.