चिपळूमधील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं असा अजब दावा करणाऱ्या तानाजी सावंत यांच्या घराबाहेर खेकडे फेकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आंदोलन केलं. तिवरे धरण फुटल्याने २३ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांनी जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं आता याप्रकरणी गुन्हा तरी कुणावर दाखल करायचा असा दावा केला होता. ज्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकाही झाली होती. आता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने तानाजी सावंत यांच्या घराबाहेर खेकडे फेकून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.

चिपळूण येथील तिवरे धरण मागील आठवड्यात फुटल्याची घटना घडली होती. हे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे विधान शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पोलिसांना खेकडे भेट देऊन धरण पोखरणार्‍या खेकड्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या आंदोलनास काही दिवस होत नाहीत तोच आज  पुण्यातील कात्रज भागात असलेल्या तानाजी सावंत यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली खेकडे फेकून आंदोलन करण्यात आले.

यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांना खेकडे भेट देऊन तिवरे धरण फोडणाऱ्या या खेकडयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली. तर तानाजी सावंत यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.