सध्याच्या काळात माध्यमांच्या उपलब्धतेमुळे कलाकारांसमोर नवीन पर्याय आहेत. हे पर्याय स्वीकारत असताना युवा पिढीतील कलाकारांसमोरची आव्हाने निराळी आहेत. पूर्वी नाटक, अभिनय याकडे करीअर म्हणून कधीच बघितले जात नव्हते. चित्रपटाच्या माध्यमातून येणारी आव्हाने स्वीकारत काम करण्यात वेगळी मजा आहे,  असे मत प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्त आयाम क्रिएशन, आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे आयोजित महिला चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन नीना कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. प्रवासी ब्लॉग लेखन करणाऱ्या रितू हरिश गोयल यांना ‘आयाम पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. पटकथालेखिका आदिती मोघे, उद्योजिका उषा काकडे, संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, आयामच्या मनस्विनी प्रभुणे, आशयचे सचिव सतीश जकातदार वीरेंद्र चित्राव या वेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर सिडने पोलॅक दिग्दर्शित ‘आऊट ऑफ आफ्रिका’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

कुलकर्णी म्हणाल्या, सध्याच्या चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारी नवीन पिढी ही परिपक्व आहे. करीअर म्हणून अभिनय क्षेत्राची निवड केल्यामुळे या क्षेत्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वेगळी आहे. त्यांना येणारे ताणदेखील वेगळे आहेत.  छान दिसणे, प्रत्येक गोष्टीत पारंगत असणे, समाजमाध्यमांवर सक्रिय असणे ही अपरिहार्य बाब झाली आहे. या क्षेत्रातील हा वाढता ताण स्वीकारण्यामुळे नवी पिढी आमच्याप्रमाणे या क्षेत्रात पुढे काही वर्षे टिकेल की नाही हा प्रश्न पडतो. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. प्राची बारी यांनी आभार मानले.