छपाईतील नव्या तंत्रामुळे पारंपरिक दर्जात बदल

गेल्या तीन-चार पिढय़ांच्या शाळारंभाच्या स्मृती पाऊ स, माती आणि पुस्तकांच्या वारंवार घ्याव्या अशा गंधांनी भरून असतील. अगदी अलीकडे दहा-पंधरा वर्षांंपूर्वीपर्यंत असलेला नव्या पाठय़पुस्तकांचा गंध कागदाच्या नव्या स्वरूपामुळे आणि यंत्राच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या बांधणीमुळे हरवला आहे. मात्र त्यामुळे राज्यभरात कोटय़ावधींच्या घरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक पुरवण्याची जबाबदारी पेलणाऱ्या बालभारतीची क्षमता वाढली आहे.

दरवर्षी सर्व इयत्तांची कोटय़वधी पुस्तकांची छपाई करणाऱ्या पाठय़पुस्तक मंडळाच्या पुस्तकांशी परिचित असलेल्या गेल्या सर्व पिढय़ांना पाठय़पुस्तकातील मराठीच्या धडय़ांची स्मृती किंवा गणिताच्या समीकरणांची धडकी, ही त्या त्या पुस्तकांच्या नव्या कोऱ्या गंधांसह मनात गोंदली गेली असेल. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वर्षांनुगणिक मोठी वाढ होत गेली आणि पाठय़पुस्तकांची मागणी वाढली. बदलत्या तंत्राच्या वापरामुळे छपाई आणि पुस्तकांच्या बांधणीची हाताने करावी लागणारी कामेही यंत्रावर होऊ लागली. पुस्तक छपाईच्या या तंत्राने छपाईची अपेक्षित आकडेवारी जुळविता आली, तरी शाळांचा पहिला दिवस साजरा करणारा नव्या पाठय़पुस्तकाचा गंध मात्र या यंत्रांना कधीच जुळवता आला नाही.

बदल कसा झाला?

पूर्वी छपाईसाठी ‘अनब्लिच’ (नॅचरल शेड) कागद वापरला जाई. छपाई झाली की पुस्तकाचे कागद एकत्र शिवून ते सिरसाच्या आधारे चिकटवण्यात येत असत. हा सिरस वितळवून त्याला ब्रशच्या साहाय्याने पुस्तकांच्या कागद आणि मुखपृष्ठ यांच्या बांधणीसाठी वापरण्यात येई. पुस्तक या सिरसमुळे पक्के बांधले जाई. पुस्तकांना येणारा गंध हा या सिरस आणि कागदाचा असे. साधारण १९९५ नंतर बालभारतीच्या राज्यभर विखुरलेल्या मुद्रणालयांनी कात टाकायला सुरूवात केली आणि अद्ययावत यंत्रे मुद्रणालयात बसली. त्यानंतर सिरसाचा वापर हळूहळू बंद झाला. त्याचप्रमाणे कागदाच्या दर्जातही फरक पडला. आता पुस्तकांसाठी स्वच्छ पांढऱ्या कागदाचा वापर होतो आणि बांधणी यंत्राच्या साहाय्याने (परफेक्ट बायंडिंग) होते. पुस्तकांच्या बांधणीसाठी गोंदाचे पांढऱ्या रंगांचे तुकडे वापरले जातात.

बालभारतीचा पसारा..

  • बालभारतीच्या पुस्तक छपाईचे काम १४५ मुद्रणालयात चालते.
  • दिवसाला साधारण १० लाख पुस्तकांची छपाई होते.
  • पहिली ते बारावीची ७ माध्यमांमध्ये पुस्तके तयार होतात.
  • सध्या ७०० पुस्तके (टायटल्स) बालभारती उपलब्ध करून देते.
  • पहिली ते बारावीची, सर्व विषय आणि माध्यमांची मिळून जवळपास

११ कोटी पुस्तकांची छपाई दरवर्षी होते.

  • त्यासाठी दरवर्षी साधारण ३० हजार मेट्रिक टन कागद लागतो.
  • ऑक्टोबरपासून या छपाईचे काम सुरू होते.