बास्केटबॉलच्या मैदानाइतक्या आकाराचा झेंडा हाती घेऊन पॅराशूटमधून स्कायडायव्हिंग करण्याच्या नव्या राष्ट्रीय विक्रमाची नुकतीच पुण्यात नोंद झाली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) देशातील सर्वात मोठा झेंडा घेऊन स्कायडायव्हिंग करीत ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’विजेते िवग कमांडर कमल सिंह ओबड यांनी हा विक्रम नोंदविला आहे.

ओबड यांनी रविवारी (२९ मे) भल्या पहाटे भारतीय लष्कराच्या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरमधून तब्बल सात हजार फूट उंचावरून उडी घेतली. त्यांनी ५१ फूट १० इंच रुंद आणि ८१ फूट ३ इंच लांब म्हणजेच ४ हजार २११ चौरसफुटांचा झेंडा बरोबर घेतला. ही उडी घेताना त्यांच्याकडे ७७ किलो वजन होते. त्यापैकी झेंडय़ाचे वजन ५२ किलो, तर पॅराशूटचे वजन २५ किलो होते. हा झेंडा गुंडाळून ठेवण्यासाठी त्यांना २७ स्नातकांनी मदत केली. एखाद्या बास्केटबॉल मैदानाला झाकू शकेल एवढा हा झेंडा मोठा आहे. ओबड हे पॅराशूट जिम्पगमधील तज्ज्ञ प्रशिक्षक असून त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. यापूर्वी त्यांनी १३०० हून अधिक वेळा पॅराजिम्पग केले असून त्यापैकी दीडशे वेळा त्यांनी रात्री उडी घेतली आहे.