नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर ‘रुबी हॉल’ने अडवणूक केल्याचा नातेवाईकांचा आरोप

हृदयाचा गंभीर आजार असलेल्या बाळाची वेळेवर शस्त्रक्रिया न झाल्याने रविवारी सकाळी या बाळाचा मृत्यू झाला. नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर ‘रुबी हॉल’ रुग्णालयाने पैशांसाठी अडवणूक केली, तसेच धनादेशही स्वीकारला नाही, असा आरोप या बाळाच्या नातेवाईकांनी केला आहे.

मृत्यू पावलेल्या बाळाच्या आई-वडिलांची नावे आम्रपाली व गौरव खुंटे अशी असून ते सेनापती बापट रस्त्यावर आशानगर येथे राहतात. शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास आम्रपाली यांची केईएम रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया होऊन त्यांना मुलगी झाली. या बाळाला जन्मत:च हृदयाचा गंभीर आजार असल्यामुळे त्याला केईएममध्ये नवजात बाळांसाठीच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.

बाळाचे कुटुंबीय कुणाल सरोदे व चंद्रमणी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ‘रुबी हॉल’मधील डॉक्टर केईएममध्ये येऊन बाळाला तपासून गेले आणि बाळाला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी प्रथम साडेतीन लाख रुपये खर्च येईल असे सांगितले गेले. सरोदे म्हणाले, ‘‘आमच्याकडे एक लाख रुपयांपर्यंत एक हजार रुपयांच्या नोटांमध्ये रक्कम होती. शनिवारी साडेदहा-अकराच्या सुमारास आम्ही ‘रुबी’मध्ये गेलो, परंतु तिथे जुन्या नोटा चालत नव्हत्या. बिलिंग विभागातील अधिकाऱ्यांना भेटल्यावर त्यांनी कोणत्याही पैशांशिवाय रुग्णाला दाखल करून घेतले जाईल असे सांगितले, परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. आम्ही धनादेश देण्याचीही तयारी दाखवली होती, मात्र संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धनादेश स्वीकारण्यात आला नाही. पाच-साडेपाचच्या सुमारास कोरा धनादेश स्वीकारण्यात आला, तसेच ३० हजार रुपयेही भरण्यास सांगण्यात आले होते. परंतु लगेच धनादेश परत करण्यात आला आणि वैद्यकीयदृष्टय़ा बाळाची अवस्था वाईट असल्यामुळे शस्त्रक्रिया करून उपयोग नाही, असे सांगण्यात आले.’’

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर निदर्शने केली.