किमान तापमान सरासरीच्या खाली

पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये रात्रीच्या किमान तापमानात बुधवारी (४ नोव्हेंबर) मोठी घट नोंदविण्यात आली. त्यामुळे शहराला थंडीची चाहूल लागली आहे. शहरातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली असून, ते १५.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. यापूर्वी ३१ ऑक्टोबरला १५.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. आकाश निरभ्र असल्याने दिवसाचे तापमान मात्र अद्यापही सरासरीपेक्षा अधिक आहे.

ऑक्टोबरमध्ये लांबलेल्या पावसाने यंदा पुण्यालाही चांगलाच फटका दिला. २८ ऑक्टोबरनंतर शहरातूनही मोसमी वारे निघून गेले. त्यानंतर तापमानात चढ-उतार सुरू झाले आहेत. शहरात पाऊस पडून गेल्यानंतर हवेत गारवा निर्माण होत असला, तरी काही वेळातच तापमानात वाढ होत होती. त्यामुळे पावसाच्या काळातही अनेकदा रात्रीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले जात होते. मोसमी पाऊस निघून गेल्यानंतर  रात्रीच्या तापमानात घट सुरू झाली. मात्र, १ नोव्हेंबरच्या दरम्यान शहरात काही प्रमाणात ढगाळ स्थिती निर्माण झाल्याने रात्रीच्या तापमानात पुन्हा वाढ झाली. ३१ ऑक्टोबरला किमान तापमान सरासरीच्या खाली जाऊन १५.२ अंशांपर्यंत आले होते. मात्र, त्यात पुन्हा काहीशी वाढ होत गेली.

सध्या शहरात दिवसा निरभ्र आकाशाची स्थिती आहे. परिणामी सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत येऊन कमाल तापमानात वाढ होत आहे. बुधवारी ३२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अद्यापही हे तापमान सरासरीपेक्षा १.३ अंशांनी अधिक आहे.

तापमानात चढ-उतार

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस शहरातील तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होणार आहेत. पुढील आठवडाभर शहरात आकाशाची स्थिती निरभ्र राहणार आहे. दोन ते तीन दिवस किमान आणि कमाल तापमानातील घट कायम राहणार असली, तरी त्यानंतर त्यात काही प्रमाणात वाढ होणार आहे. रात्रीचे किमान तापमान या आठवडय़ात १७ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार आहे. दिवसाच्या कमाल तापमानातही किंचित वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

रात्रीच्या तापमानाची स्थिती

’ ३१ ऑक्टोबर – १५.२

’ १ नोव्हेंबर- १७.१

’ २ नोव्हेंबर- १८.८

’ ३ नोव्हेंबर- १७.२

’ ४ नोव्हेंबर – १५.१

(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)