फर्ग्युसन महाविद्यालयात झालेल्या वादात विद्यार्थ्यांकडून देशविरोधी घोषणा देण्यात आल्या नाहीत, असा दावा पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांना केला आहे.
फग्र्युसन महाविद्यालयात जेएनयूतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अलोक सिंग यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूने घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. दरम्यान देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे पत्र महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी डेक्कन पोलिसांना दिले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला. प्राचार्यानी नंतर हे पत्र मागे घेऊन मूळ पत्रातील मजकुरात चूक (प्रिटींग मिस्टेक) झाल्याचा खुलासा केला होता.
पोलिसांनी याबाबत तपास केला. फग्र्युसन महाविद्यालयात झालेल्या वादात विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत. मनुवाद आणि साम्राज्यवादाबाबतच्या घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या, असे पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.