पुणे महापालिकेला अर्थसहाय्य करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन नाही

पुणे : गेल्या चार महिन्यांत महापालिके ने ३०० कोटी रुपयांपर्यंत निधी खर्च के ला आहे. आता महापालिकेची आर्थिक मर्यादा पाहता राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणेच नव्हे, तर राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर असून महापालिका राज्य सरकारकडे आणि आम्ही के ंद्राकडे निधीची मागणी करत आहोत, असे सांगत कोणतेही ठोस आश्वासन या वेळी दिले नाही.

विभागीय आयुक्तालयात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील करोनाच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, करोनाचे रुग्ण आणि मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरातील वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा वाढवण्यासाठी महापालिके नेच पुढाकार घ्यावा. तपासणी अहवाल सकारात्मक आलेले रुग्ण रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करतात. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे. रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यासाठी खासगी प्रयोगशाळांनी करोना चाचणीचे अहवाल रुग्णांना परस्पर न देता महापालिके ला द्यावेत.

दरम्यान, बैठकीत उपस्थित भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली. वाढते रुग्ण लक्षात घेता वैद्यकीय सुविधा वाढवणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयांतील कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या खाटा वाढवण्यात याव्यात. मोठी करोना काळजी केंद्रे उभारण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील खाटा वाढवाव्यात, याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले. प्रशासनाकडून खासगी रुग्णालयातील ८० टक्के  खाटा नियंत्रणाखाली आणल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, वास्तवात तशी परिस्थिती नाही, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांची देयके  करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांना देण्यात येत आहे. झोपडपट्टी भागात गेल्या चार महिन्यांपासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून मर्यादा असल्याने तेथील नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, असे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आदी या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले..

’ केंद्राकडून आलेल्या कृत्रिम श्वसन यंत्रणेत त्रुटी

’ पुण्यात अनेक खासगी रुग्णालये असूनही खाटा उपलब्ध नाहीत, हे योग्य नाही

’ छोटी घरे असणाऱ्या करोना रुग्णांच्या संस्थात्मक अलगीकरणावर भर द्या

’ कृत्रिम श्वसन यंत्रणा, वैयक्तिक सुरक्षा साधने, एन ९५ मुखपट्टीचा पुरवठा करण्यासाठी केंद्राला विनंती