‘पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा अभ्यास करूनच बहि:स्थ अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी विद्यापीठ प्रशासन घेत आहे,’ असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बहि:स्थ पद्धतीने पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात यावा, अशी भूमिका विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आली होती. त्यामुळे पदव्युत्तर बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करण्यात आल्याचा समज झाला होता. या पाश्र्वभूमीवर विद्यापीठांमध्ये आंदोलनेही झाली होती. याबाबत बहि:स्थ पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्याबाबतीत विद्यापीठाने अजूनही काही निर्णय घेतला नसल्याचे डॉ. गाडे यांनी स्पष्ट केले.
या वेळी डॉ. गाडे म्हणाले, ‘‘पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यावर्षीपासून क्रेडिट सिस्टिम लागू करण्यात आली आहे. ही पद्धत बहि:स्थ अभ्यासक्रमाला लागू करता येणार नाही. मात्र, या प्रश्नाबाबत विद्यापीठ सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.’’