केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या समर्थनाबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमवेत कोणत्याही स्वरूपाचे मतभेद नाहीत, असा निर्वाळा संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष खासदार शरद यादव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सामान्यांचे हाल झाले त्या मुद्दय़ावर पक्षाचा विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

[jwplayer COg4j5yb]

नोटाबंदीच्या निर्णयाला नितीशकुमार यांनी पाठिंबा दिला असताना आपण संसदेत विरोध का केलात, असे विचारले असता शरद यादव म्हणाले, काळा पैसा बाहेर आला पाहिजे याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. काळा पैसा बाहेर आणण्याच्या मुद्दय़ावर पक्षाचा केंद्र सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळेच नोटाबंदीच्या निर्णयाला नितीशकुमार यांनी समर्थन दिले ते योग्यच आहे. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सामान्य नागरिकांचे जे हाल झाले त्या मुद्दय़ावर पक्षाचा विरोध आहे. मी संसदेत केवळ जनतेला झालेल्या त्रासाबद्दल बोललो होतो.

नोटाबंदीच्या निर्णयाची नियोजनपूर्वक अंमलबजावणी झाली नाही याविषयी बोलताना यादव म्हणाले, देशातील विविध बँकांमध्ये १० लाख कोटी रुपयांचे ‘अनुत्पादित कर्ज’ (एनपीए) आहे. काळा पैसा बाहेर काढण्याची इच्छा असेल तर त्या बडय़ा खातेदारांना हात लावायला हवा होता. ते करायचे सोडून सामान्य नागरिक, शेतकरी आणि छोटे उद्योग यांना मोडकळीस आणण्याचे प्रकार सुरू आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाने धास्तावलेल्या नागरिकांनी भरलेल्या पैशांमुळे बुडीत बँकादेखील नफ्यामध्ये आल्या आहेत. सरकारचा उद्देश चांगला असला तरी सामान्यांच्या खिशाला हात घालणे चुकीचे आहे.

[jwplayer lhPgv5TV]