News Flash

भुशी डॅम भागात दुपारी तीननंतर ‘नो एंट्री’

लोणावळ्याच्या भुशी डॅमच्या परिसरात बेशिस्त व मद्यधुंद पर्यटकांच्या धिंगाण्याला आळा घालण्यासाठी लोणावळा पोलिसांनी यापुढे दुपारी तीननंतर या भागामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

| July 26, 2014 03:30 am

लोणावळ्याच्या भुशी डॅमच्या परिसरात बेशिस्त व मद्यधुंद पर्यटकांच्या धिंगाण्याला आळा घालण्यासाठी लोणावळा पोलिसांनी कंबर कसली आहे. यापुढे दुपारी तीननंतर या भागामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे संध्याकाळी पाचच्या पूर्वी हा भाग पूर्णपणे रिकामा करण्यात येणार आहे. धरणात बुडून किंवा धबधब्याच्या दगडांवर चढताना होणारे मृत्यू टाळण्यासाठी धोकादायकपणे वागणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोणावळय़ात पर्यटनासाठी येणाऱ्यांची बेशिस्त आणि तरुणाईच्या उन्मादामुळे दरवर्षी सरासरी १० ते १५ जणांना जीव गमवावा लागतो. सध्या लोणावळा परिसरामध्ये चांगला पाऊस पडत असल्याने वर्षांविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, या पर्यटनातील बेफामपणा, अतिउत्साह व निष्काळजीपणामुळे पर्यटकांचे अपघातही वाढत आहेत. बहुतांश पर्यटक हे मद्यपान करूनच आलेले असतात. त्यामुळे अशा पर्यटकांचा िधगाणा इतरांनाही त्रासदायक ठरतो आहे. या सर्वाबाबत आता पोलिसांनी कठोर निर्णय घेतले आहेत.
लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुशी धरणाच्या परिसरात येणारे सर्व रस्ते दुपारी तीननंतर बंद केले जाणार आहेत. त्यानंतर कुणालाही परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे संध्याकाळ पाचनंतर सर्व पर्यटकांना या परिसरातून बाहेर काढले जाणार आहे. मद्यप्राशन करून किंवा धोकादायक पद्धतीने धबधब्यांच्या दगडावरून चालणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. अशा पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बेशिस्त पर्यटकांमुळे या भागात पर्यावरणाची हानी होते आहे. त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीची गंभीर समस्याही निर्माण होते आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
 
पोलीस अधीक्षक म्हणतात..
‘‘पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यटकांचा उन्माद रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून लोणावळा, मुळशी, खडकवासला, पौड, पिंरगुट या परिसरात बंदोबस्त ठेवला जातो. ताम्हिणी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी नाकाबंदी केली जाते. या परिसरात पोलिसांची गस्त सुरू असते. लोणावळा परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणच्या महत्त्वाच्या पॉईन्टवर पोलीस बंदोबस्त तैनातकेलेला असतो. लोणावळा परिसरात किल्ले आणि काही महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. या ठिकाणी पर्यटकांची वाढती गर्दी पाहता पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. या काळात पर्यटनाच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त २५ ते ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली असते. शनिवार आणि रविवारी या भागात पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या दोन दिवशी कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द करून त्यांची त्या दिवशी नेमणूक केली जाते. लोणावळा परिसरात मद्यपान करून येणाऱ्या तरुण-तरुणींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई होते. लोणावळा परिसरात शनिवार आणि रविवारी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने मोटारींची संख्या जास्त असते. वाहतुकीची कोंडी होते. ती अतिरिक्त पोलीस कर्मचारी लावून कमी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. माळशेज घाट परिसरात ठाणे पोलिसांचा बंदोबस्त असतो.’’
– मनोज लोहिया (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 3:30 am

Web Title: no entry after 3 p m at bhushi dam
Next Stories
1 स्वबळाची भाषा.. पण तयारीचे काय?
2 प्लँचेट प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत सुरू
3 कागदवेचक कर्मचाऱ्यांच्या मुलांची शिष्यवृत्ती रोखली
Just Now!
X