शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठय़ा जागा न शोधता छोटय़ा छोटय़ा जागांमध्ये छोटे प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी आरक्षित जागांचा शोध घेतला जाईल. शहराचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतानाच कचरा प्रक्रिया व व्यवस्थापनाला प्राधान्य दिले जाईल, असे महापालिकेचे नवे आयुक्त विकास देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांबाबत मवाळ भूमिका घेणार नाही, असेही ते म्हणाले.
महापालिका आयुक्त म्हणून देशमुख यांनी मंगळवारी सकाळी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला. महेश पाठक या वेळी उपस्थित होते. त्यानंतर महापौर चंचला कोद्रे यांनी देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, सभागृहनेता सुभाष जगताप, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांची या वेळी उपस्थिती होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देशमुख म्हणाले की, उरुळीत कचरा गाडय़ांवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. तसेच तेथे आंदोलनही सुरू आहे. तेथील ग्रामस्थांशी चर्चा करून या प्रश्नी तोडगा काढला जाईल. कचरा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील युवकांना महापालिकेत कायमस्वरुपी नोकरी देण्यासंबंधीही राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल. वढू येथील प्रस्तावित जागेसाठी महापालिकेने पैसे भरले होते. मात्र, स्थानिक नागरिकांचा विरोध असल्यामुळे ही जागा ताब्यात येऊ शकत नाही. दगडखाणी, सरकारी तसेच खासगी आरक्षित जागा ताब्यात घेऊन तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे प्रकल्प उभे केले जातील.
महापालिका हद्दीलगतच्या गावांमध्ये जी अनधिकृत बांधकामे झाली होती त्यांच्यावर जिल्हाधिकारी असताना कारवाई केली होती. त्या वेळी मनुष्यबळही नव्हते. यापुढेही महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांबाबत मवाळ भूमिका घेणार नाही. कोणत्याही अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिले जाणार नाही, असेही देशमुख यांनी या वेळी स्पष्ट केले.
आयुक्त म्हणाले की, महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या सर्वच गावांच्या पाणीपुरवठय़ाचे तसेच कचऱ्यासंबंधीचे नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हा पर्यावरण आराखडाही तयार आहे. महापालिकेच्या दहा किलोमीटर परिसरातील गावे एकत्र करून समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) करावा लागेल. त्यासाठी भामा आसखेडचा नियोजित प्रकल्प मार्गी लावला जाईल. तसेच सहा टीएमसी सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडल्यास तेवढे पाणी धरणातून मिळणार असल्यामुळे त्या प्रक्रियेबाबतही कार्यवाही केली जाईल. मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करणे तसेच विकास आराखडा आदी महत्त्वाचे विषय शहर विकासाच्या दृष्टीने मार्गी लावण्यावरही भर दिला जाईल. महापालिकेचा कारभार कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.