फटाक्यांच्या लांबलचक माळांचा कडकडाट आणि बिनआवाजी फटाक्यांचा प्रचंड धूरही यंदाच्या दिवाळीत कमी होणार आहे. गेल्या पाच वर्षांत फटाक्यांचा खप दर वर्षी वेगाने कमी होत आहे. हा खप पाच वर्षांत जवळपास निम्म्याने कमी झाला असून ग्राहकच आवाजी आणि धूर करणाऱ्या फटाक्यांना नको म्हणत असल्याचे निरीक्षण फटाका बाजारातील विक्रेत्यांनी नोंदवले आहे.
पुण्याच्या घाऊक फटाका बाजारात गेल्या दोन वर्षांपासून मंदीचा फटका विशेष जाणवत आहे. लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवसापर्यंत ग्राहकांच्या खचाखच गर्दीने भरून जाणाऱ्या म्हात्रे पुलाजवळील घाऊक फटाका गाळ्यांमध्ये सध्या फारशी गर्दी नाही. गेल्या काही वर्षांत फटाक्यांचा वापर कमी करण्याबाबत विविध स्तरातून जागरुकता निर्माण केली जात आहे. फटाक्यांचे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याने या प्रयत्नांना प्रतिसादही मिळत आहे. अनेक शाळा, सोसायटय़ांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. याचा परिणामही फटाक्यांची विक्री घटण्यावर झाला आहे.
‘वर्धमान फटाका मार्ट’चे सागर काळे म्हणाले, ‘‘अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत आम्हाला नरकचतुर्दशीच्या दिवसापर्यंत श्वास घेण्याचीही उसंत नसे. पण या वर्षी आम्हाला चक्क निवांत बसून राहावे लागत आहे. चार वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवसात आमची २० ते २५ लाखांची उलाढाल होत होती. ती आता ८ ते १० लाखांवर आली आहे. फटाक्यांच्या माळा, सुतळी बाँब, अॅटम बाँब, लक्ष्मी फटाके यांची मागणी कमालीची रोडावली आहे. आवाजी आणि धूर करणारे फटाके नकोतच असे ग्राहक आवर्जून सांगत आहेत. फुलबाजी, भुईचक्र, भुईनळे अशा शोभेच्या फटाक्यांना तसेच लवंगी, पानपट्टीसारख्या कमी आवाजाच्या फटाक्यांना ग्राहकांची पसंती आहे. आकाशात उडवण्याच्या ‘फॅन्सी’ फटाक्यांना मात्र चांगली मागणी आहे.’’
प्रचंड धूर करणाऱ्या रंगीत फुलबाज्यांचीही मागणी घटल्याची माहिती ‘सुंदर फटाका मार्ट’चे राहुल गायकवाड यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘आवाजाचा किंवा धुराचा त्रास नको हा बऱ्याच ग्राहकांचा दृष्टिकोन असल्याचे दिसून येते. त्याबरोबरच फटाक्यांच्या किमती भरमसाठ वाढल्यामुळेही विक्री घटली आहे. फटाका बाजारातील गाळ्याच्या जागेचे वाढणारे भाडे, मांडव घालण्याचा खर्च, सेवा कर या सर्व खर्चामुळे फटाक्यांची विक्री किंमत वाढत आहे.’’
‘बिर्ला, आगरवाल अँड कंपनी’च्या मनीषा देशमुख म्हणाल्या, ‘‘गेल्या ३ ते ४ वर्षांत आवाजी व धूर सोडणाऱ्या फटाक्यांबद्दल प्रसारमाध्यमे व सोशल माध्यमांमधून जनजागृती होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे फटाका विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच फटाके दिवसेंदिवस अधिकाधिक महाग होत चालले आहेत.’’

‘‘गेल्या पाच वर्षांत फटाक्यांचा व्यवसाय ५० ते ६० टक्क्य़ांनी घटला आहे. आवाज आणि धुराच्या त्रासाबद्दल वाढलेल्या जनजागृतीचा हा परिणाम असावा. देशात फटाके प्रामुख्याने शिवकाशीत बनतात. पूर्वी या व्यवसायात बालकामगारांना कमी मोबदल्यात राबवून घेण्याचे प्रमाण अधिक होते. बालकामगारांकडून काम करून घेण्यावर बंधने आल्यानंतर फटाके उत्पादनात मजुरीचे दर वाढले आणि फटाक्यांच्या किमती वाढू लागल्या. रस्त्यावर फटाके उडवण्यास असलेली बंदी, ठराविक डेसिबलच्या वर आवाज जाऊ नये यासाठीची बंधने या सर्व गोष्टींची परिणती फटाक्यांची मागणी घटण्यात झाली असावी.’’
– ओमप्रकाश काळे, वर्धमान फटाका मार्ट, काळे बंधू