मुंढव्यातील केशवनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (२६ मे) रात्री घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

सूरज बबलू आटोळे (वय २२, रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या सराइताचे नाव आहे. या प्रकरणी सुभाष रमेश केंगार (वय २४) आणि प्रकाश तुकाराम भोसले (वय २६, दोघे रा. पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांना अटक करण्यात आली. आटोळे याची आई रमा यांनी यासंदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आटोळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरु द्ध पोलिसांनी झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. आटोळे आणि आरोपी केंगार, भोसले यांची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. आटोळे दोघांना त्रास द्यायचा. त्यांना धमकावून पैसेही घ्यायचा. गुरुवारी रात्री आरोपींनी त्याला दारू पिण्याच्या बहाण्याने केशवनगर परिसरातील आमराई परिसरात नेले. त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली तसेच आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला.

पसार झालेले आरोपी भोसले आणि केंगार यांना अटक करण्यात आली असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण तपास करत आहेत.