परराज्यात गेल्यावर तिथली भाषा न समजण्याची मोठी अडचण आता मोबाइलच्या साहाय्याने दूर करता येणार आहे. पुण्यातील ‘प्रगत संगणन विकास केंद्रा’तर्फे (सीडॅक) ‘व्हॉइस रेकग्निशन ट्रान्सलेशन’ हे अॅप्लिकेशन विकसित करण्यात येत आहे. हे अॅप्लिकेशन वापरून मोबाइलवर एका भाषेत बोललेली वाक्ये दुसऱ्या भाषेत भाषांतरित होऊन ऐकू येऊ शकणार आहेत. येत्या एका वर्षांत पर्यटन आणि आरोग्य या दोन क्षेत्रांसाठी हे अॅप्लिकेशन विकसित होण्याची अपेक्षा आहे.
सीडॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात या अप्लिकेशनमध्ये हिंदी आणि मराठीबरोबरच मल्याळम, बंगली आणि पंजाबी या भाषांचा समावेश असणार आहे. यापूर्वी सीडॅकने दृष्टिहीनांसाठी ‘श्रुतिदृष्टी’ आणि ‘श्रुतलेखन’ ही दोन अॅप्लिकेशन्स विकसित केली असून ती यशस्वीपणे वापरली जात आहेत. श्रुतिदृष्टी हे अॅप्लिकेशन दृष्टिहीनांना इंटरनेटवर शोधलेली माहिती ऐकवते. तर श्रुतलेखनमध्ये हिंदी भाषेत उच्चारलेली वाक्ये लेखी इंग्लिशमध्ये भाषांतरित होतात. सध्या ही अॅप्लिकेशन्स केवळ संगणकावरील वापरासाठी उपलब्ध असून सलग एकाच भाषेत बोलले गेलेले वाक्य भाषांतरित होण्याची अचूकता ८० ते ८५ टक्के असल्याचे डॉ. दरबारी यांनी सांगितले. याचेच विस्तारित रूप म्हणून ‘व्हॉइस रेकग्निशन ट्रान्सलेशन’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हे अॅप्लिकेशन क्लाऊड प्रणालीवर आधारित आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पर्यटन आणि आरोग्य या क्षेत्रांचा समावेश आहे. परराज्यात जाणाऱ्या मंडळींना अनोळखी भाषेचे बंधन दूर करण्यासाठी या अॅप्लिकेशनचा उपयोग होऊ शकेल. तसेच वेगवेगळ्या भाषा बोलणारे डॉक्टर व रुग्णही एकमेकांचे म्हणणे जाणून घेऊ शकतील.
सीडॅकच्या ‘जीआयएसटी’ (ग्राफिक्स अँड इंटलिजन्स बेस्ड स्क्रपिं्ट टेक्नोलॉजी) विभागाचे सहयोगी संचालक महेश कुलकर्णी म्हणाले, ‘‘एकच भाषा वेगवेगळ्या लहेजाने बोलली जाणे, सलग एकाच भाषेत न बोलता दोन-तीन भाषांचे मिश्रण करून बोलणे आणि एकच शब्द वेगळ्या प्रसंगांत वेगळ्या अर्थाने प्रकट होणे अशा अनेक आव्हानांचा सामना हे अॅप्लिकेशन विकसित करताना करावा लागणार आहे. तसेच वाक्यांच्या जोडीला प्रकट होणारी भावना भाषांतरित होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वाक्यातही प्रकट होणे हा टप्पा गाठणे अजून दूर आहे.’’