‘पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला पर्याय नसून सरकारने याबाबतीत गांभीर्य बाळगले पाहिजे. दुर्दैवाने प्रस्तावित नदीजोड प्रकल्पात अनवधानाने महाराष्ट्राकडे अक्षम्य दुलक्र्ष होत आहे’, असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि अभ्यासक राजेंद्र माहुलकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पुणे विभाग आणि एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण तज्ज्ञ डॉ. दिलीप बोराळकर यांना ‘पर्यावरण भूषण’ पुरस्कार देण्यात आला, त्या वेळी माहुलकर बोलत होते. या वेळी अफगाणिस्तानचे अधिकारी जाहीद वालीद, इस्त्रायलचे ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह इलान डीव्हॉक, बेल्जियमच्या व्हाईस काउन्सिल पिंकी अहलुवालिया, डी.टी. देवळे, विश्वास मुंडे आदी उपस्थित होते.
महुलकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा पाण्याच्या कमतरतेमुळे ग्रासलेला आहे. त्यामुळे नदीजोड प्रकल्पात महाराष्ट्र देखील जोडला जाणे आवश्यक आहे. नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा मोठा अडथळा आहे.’’ नवनिर्वाचित पंतप्रधानांनी गंगा शुद्धीकरणाचा केलेला संकल्प स्वागतार्ह असून गंगेसह सगळ्या नद्यांच्या शुद्धीकरणाबाबत असलेला त्यांचा आग्रह निश्चित आशादायी असल्याचेही ते म्हणाले.