म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी या रस्त्यावर ‘नो पार्किंग झोन’ चा घेतलेला निर्णय बारगळण्याची शक्यता असून कोणतीही योजना न राबविता येथे ‘जैसे थे’ अशीच स्थिती राहणार असल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या नो पार्किंगवर मागविलेल्या हरकती, सूचनांमध्ये सूचनांपेक्षा हरकतीच जास्त आल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ‘नो पार्किंग’बाबत निर्णय घेतलेला नाही.
म्हात्रे पूल ते राजाराम पुलाच्या वळणावरील मातोश्री आश्रम या संपूर्ण भागात नो पार्किंग झोन आणि नो हॉल्टिंग करण्याची अधिसूचना १५ डिसेंबर रोजी पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी काढली होती. २० डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान हा रस्ता प्रायोगिक तत्त्वावर नो पार्किंग झोन करण्यात आला होता. त्यासाठी नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. ३ जानेवारीपर्यंत येणाऱ्या हरकती, सूचनांचा विचार करून या ठिकाणीचा निर्णय घेतला जाणार होता. मात्र, या ठिकाणाबाबत सूचना व हरकतींचा पाऊसच वाहतूक शाखेकडे पडला असून त्या अजूनही येतच आहेत. येणाऱ्या सूचनांमध्ये हरकतीचेच प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्या हरकतीमध्ये ‘या ठिकाणी नो पार्किंग करू नये’ असेच म्हटले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कोणता निर्णय घेतलेला नाही.
डीपी रस्त्यावर असलेल्या मंगल कार्यालयांसमोर पार्किंग केलेल्या वाहनांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्याचा स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रयोगिक तत्त्वावर नो पार्किंगचा निर्णय घेतला होता. पण, आता हरकतीच जास्त आल्यामुळे नो पार्किंग तर करता येणार नाही. मग, या ठिकाणी पी वन, पी टू करून पाहावे का याबाबत ही वाहतूक पोलीस विचार करीत आहेत. मात्र, तसे झाल्यास पार्किंगची व्यवस्था न करणाऱ्या मंगल कार्यालयांना त्यांच्याकडे येणाऱ्या वाहने लावण्यासाठी अधिकृत परवाना मिळेल, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.