ढोल-ताशा वादन ही राज्यातील जुनीच परंपरा, त्यामुळे राज्यातील सर्वच भागांत ढोल-ताशाचा वापर होतच असतो. त्यात पुणेरी ढोल-ताशा पथके वेगळी ठरली ती शिस्तीमुळे. मात्र, आता पथकांमधील शिस्तही हरवत चालली आहे. त्याचबरोबर सुरक्षेचा मुद्दही पुढे येत आहे. पथकांमुळे त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत.शिस्त, वादनाची विशिष्ट पद्धत आणि वेगळे ताल हे पुण्यातील ढोल-ताशा पथकांचे वैशिष्टय़. पुण्यातील पथकांचा आदर्श समोर ठेवून मुंबईसह इतर भागांतही पथके सुरू झाली. मात्र, पुण्यातील पथकांची शिस्त आता हरवली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन पथकांमधील आपापसातील भांडणे, मारामारी अशाही घटना घडल्या आहेत. या पथकांमध्ये मुली आणि लहान मुलांचाही मोठय़ा प्रमाणावर सहभाग आहे. बहुतेक पथके वादकांना ओळखपत्र देतात. मात्र, तरीही पथकातील मुली, लहान मुले यांच्या सुरक्षेचा प्रश्नही आहे. बहुतेक साऱ्या पथकांनी आता ऑनलाइन नोंदणाची पर्याय स्वीकारला आहे. पथकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नोंदणी होते. काही मोठय़ा पथकांमध्ये अगदी चारशे ते पाचशे वादक आहेत. मात्र, प्रत्यक्ष सहभागी किती, फक्त नोंद केलेली मुले किती याची खातरजमा न करताच बहुतेक वेळा ओळखपत्र दिली जातात. त्यामुळे पथकांची ओळखपत्रे घेऊन मिरवणुकांमध्ये घुसणारेही अनेक आहेत.थकांमुळेही नागरिकांना काही समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. पथकांतील मुलांच्या गोंधळाचा, पथकांच्या सरावाचा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. गणेशोत्सवाच्या आधी किमान दोन महिने पथके सराव सुरू करतात. म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यानचा नवा डीपी रस्ता, नदी पात्रातला रस्ता, सिंहगड रस्ता, शाळा-महाविद्यालयांची मध्य वस्तीतील मैदाने; किंबहुना शहरातील दिसेल ती मोकळी जागा हेरून पथके सराव करतात. प्रत्येक पथकाच्या किमान ३० ते ४० वाद्यांचे वादन एकाच वेळी होत असते. सायंकाळी ५ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत सलग सराव सुरू असतात. सुट्टीच्या दिवशी दुपारपासून वादन सुरू होते. सरावा दरम्यान होणाऱ्या आवाजाच्या त्रासाच्या पोलिसांकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. गेल्यावर्षी ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी पोलिसांनी टोल वाजवण्यावर बंदी घातली. मात्र, अजूनही काही पथकांमध्ये टोलचा वापर केला जातो. सराव पाहण्यासाठी बघ्यांचीही गर्दी असते. त्यामुळे वाहतुकीची समस्याही निर्माण झाली आहे. सरावाच्या ठिकाणी मांडव घालून तेथे वाद्ये ठेवली जातात. रात्री सराव संपला की यातील अनेक मांडवांमध्ये दारूपाटर्य़ाही रंगलेल्या दिसतात. या सगळ्या पाश्र्वभूमीवर पथकांसाठी काही नियम करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
नावीन्य हरवले
एखाद दुसरा अपवाद वगळला, तर बहुतेक पथकांमध्ये आता ठरावीकच ताल वाजवले जातात. आपला एखादा वेगळा ताल बसवण्याची चुरस पथकांमध्ये असायची. वादनाचे वेगवेगळे प्रयोग केले जायचे. मात्र, आता वादनातील वेगळेपणही हरवत चालले आहे.

‘‘ढोल-पथकाच्या सरावासाठी जमलेल्या मुलांची दादागिरी चालते. एका वेळी जवळपास ८ ते १० पथकांचा सराव सुरू असतो. आवाजाबाबत तक्रार केल्या तरीही त्याची दखल घेतली जात नाही. पूर्वी गणेशोत्सवाच्या आवाजाचा त्रास हा फारतर पंधरा दिवस असायचा. मात्र, आता तीन महिने हा गोंधळ सुरूच असतो. रात्री वादन बंद असले, तरी उशिरापर्यंत मुलांचा गोंधळ सुरूच असतो.’’

 जनार्दन जोशी, एरंडवणे