कांद्याच्या भाववाढीने अस्मान गाठले असताना, कांद्यावरून वांदे होण्याची अनेक प्रकरणे उजेडात येत आहेत, त्यातच, िपपरी भाजीमंडईतील कांदेचोरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेहमी मंडईत भुरटय़ा चोऱ्या होणाऱ्या मंडईत ४०० किलो कांदे चोरीला गेले. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी तिघांना गजाआड केले. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजने महत्त्वाची कामगिरी बजावली.

िपपरी बाजारपेठेतील भाजीमंडईत एका विक्रेत्याचे सुमारे ४०० किलो कांदे अज्ञात चोरटय़ांनी लांबवले होते. त्याआधीही मंडईत चोऱ्या होत होत्या. मंडईतील भुरटय़ा चोऱ्यांमुळे विक्रेते वैतागले होते. त्यातच ४०० किलो कांदे असलेल्या सात पोत्यांच्या चोरीचा प्रकार घडला. रात्री अडीचच्या सुमारास झालेली ही चोरी समोरच्या एका दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली.