|| प्राची आमले

समाजमाध्यमांच्या वापरातून होणारं सकारात्मक काम, असा विचार केला तर आपल्या डोळ्यांसमोर अगदीच मोजके पर्याय उभे राहातात. पण जनकल्याण रक्तपेढीसारखी रक्तदानातून जीवदान देणारी संस्था याच समाजमाध्यमांचा वापर करुन रक्तदानाच्या क्षेत्रात क्रांती करु बघते आहे. रक्तदानाच्या लहान-मोठय़ा मोहिमांना प्रचंड चळवळीचं स्वरुप देणाऱ्या समाजमाध्यमांच्या योगदानाविषयी या लेखात माहिती घेणार आहोत.

अपघात किंवा एखादं गंभीर आजारपण सांगून येत नाही. अशा वेळी उपचारांसाठी वाट्टेल ती किंमत खर्च करायची आपली तयारी असते, पण काही प्राथमिक गोष्टी मात्र पैसे देऊनही विकत घेता येत नाहीत. रक्त ही अशीच एक मौल्यवान गोष्ट.

कुठल्या परिस्थितीत कोणाला रक्ताची गरज पडेल सांगता येत नाही. आयत्या वेळेला रक्ताची गरज भागवता भागवता रूग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होते. अनेक वेळा रक्त वेळेत न मिळाल्याने रूग्ण दगावल्याची किंवा शस्त्रक्रिया पुढे ढकलायला लागल्याचं कानावर पडतं. नागरिकांची हीच रक्ताची गरज भागवण्यासाठी जनकल्याण रक्तपेढी गेली अनेक वर्ष काम करत आहे. बदलत्या काळानुसार जनकल्याण रक्तपेढीनेही स्मार्ट रुप धारण केलंय. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर अशा समाजमाध्यमांचा वापर करत रक्ताची गरज पूर्ण करत जनकल्याण रक्तपेढीने समाजमाध्यमांवर स्वेच्छा रक्तदानाची एक मोठी चळवळच उभी केली आहे.

संस्थेचे व्यवस्थापक महेंद्र वाघ रक्तपेढीविषयी माहिती देताना म्हणाले, की आमच्याकडे चालणारे शंभर टक्के रक्तदान हे पूर्णपणे स्वेच्छेने केले जाते. रक्तपेढी ही तांत्रिकदृष्टय़ा अद्ययावत आहे. शहरातल्या १५० रूग्णालयांना रक्तपेढीमार्फत रक्त पुरविले जाते. रक्ततपासणीची सर्वात सुरक्षित पद्धत रक्तपेढीमध्ये वापरली जाते. फक्त शहरापुरते मर्यादित न राहता, इतर जिल्ह्य़ांना देखील रक्त पुरविण्याचे काम सध्या जनकल्याणकडून केले जाते. पेढीकडून ‘ब्लड कुरिअर’ ही सेवा अत्यंत लोकप्रिय आहे. याविषयी वाघ म्हणाले,की विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक वेळा रूग्णाजवळ नातेवाईक नसतात, मग अशा वेळी रूग्णाला लागणारी रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी रक्तपेढीकडून मुले रूग्णालयात पाठविली जातात. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन येतात आणि नमुन्याची तपासणी करून ज्या वेळी रूग्णाला रक्ताची गरज असते त्या वेळी रक्त रूग्णालयात पोहोचविले जाते. ही सेवा चोवीस सेवा पुरविली जाते. स्वयंसेवकांच्या मदतीने थॅलेसेमिया विषयी समाजप्रबोधन करण्याचे काम हाती घेतले आहे.

राजेश तोळबंदे समाजमाध्यमाच्या सहभागाविषयी म्हणाले,की फेसबुक, टिवट्र, व्हॉटसअ‍ॅप या समाजमाध्यामांना लोकांचा उत्फूर्त प्रतिसाद असून रक्तपेढीविषयी कोणतीही माहिती टाकल्यास ती काही वेळातच लोकांपर्यंत पोहोचते. बऱ्याच कंपन्यांमध्ये मोबाईल फोन वापरू दिला जात नाही, मग अशावेळी रक्तपेढीची गरज पूर्ण करण्यासाठी आमचे १५ ते २० व्हॉटसअ‍ॅप ब्रॉडकास्टींग ग्रुप असून या माध्यमातून चार हजारांपेक्षा अधिक रक्तदाते आम्हाला जोडले गेले आहेत. जनकल्याण रक्तपेढीचे फेसबुक पेज हे ५००० लाईक्स असलेले महाराष्ट्रातील पहिले पेज आहे.

समाजमाध्यमांच्या द्वारे लोकांपर्यंत अद्ययावत माहिती पुरविली जाते. पावसाळ्यात डेंग्यूची साथ आल्यानंतर काही रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात. अशा वेळी घाबरून न जाता त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी माहिती समाजमाध्यमांचा वापर करत लोकांपर्यंत पोहोचवली जाते. तसेच यूटय़ूब चॅनेल वर देखील रक्तदान करताना कोणती काळजी घ्यावी, माझ्या रक्ताचे पुढे काय केले जाते, मी रक्तदान करू शकतो का, अशा लोकांच्या मनातल्या छोटय़ाछोटय़ा प्रश्नांची उत्तरे दिली जातात. समाजमाध्यमांचा वापर करत स्वेच्छा रक्तदान चळवळ मोठी करायची आहे.

रक्त गोळा करणे, त्याची साठवणूक करणे व जेव्हा गरज भासेल तेव्हा ते रूग्णांपर्यंत पोहोचविणे एवढय़ावरच न थांबता येत्या काळात स्वेच्छा रक्तदानाविषयी शाळा, महाविद्यालये, कंपन्यांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर थॅलिसेमीया या रक्तासंबंधी आजाराविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.