खातेदाराला बँकेतून बोलवत असल्याचे सांगून खात्याची सर्व गोपनीय माहिती घेत दोन लाखांची फसवणूक केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडेवाडी येथील वर्षां उदावंत (वय ४५) यांना गुरुवारी मोबाईल फोन आला. त्यांना बँकेतून बोलत असल्याचे सांगण्यात आले. ‘एटीएमकार्डची माहिती न दिल्यास तुमचे एटीएमकार्ड बंद करण्यात येईल’ असे सांगितले. उदावंत यांच्याकडून खात्याची गोपनीय माहिती मिळवली. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या खात्यावरील ऑनलाईन बँकिंगव्दारे वेळोवेळी एक लाख ५३ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार समजल्यानंतर उदावंत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन व्यक्तींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शिरसाठ हे अधिक तपास करीत आहेत. धानोरी येथील अभिषेक रंजन यांना देखील बँकेचा ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे सांगून फोन केला. त्यांचे खाते आणि डेबिट कार्ड बंद करण्यात येणार आहे. सुरू ठेवण्यासाठी खात्याची सर्व माहिती त्यांच्याकडून काढून घेतली. त्या माहितीच्या आधारे खात्यावरील २० हजार रुपये काढून घेतले. त्याबरोबरच अमर वाघमारे यांना देखील अशाच पद्धतीने फोन करून माहिती घेतली. त्यांच्या खात्यावरील ४२ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक हे अधिक तपास करीत आहेत.